Manoj Jarange Patil :मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती. मात्र, सध्या सर्वत्र गणेश उत्सवाची धूम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने सुरुवातीला आंदोलनाची परवानगी नाकारली होती. मात्र, आता न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी काही अटी घातल्या आहेत.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्ट २०२५ रोजी आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना सशर्त परवानगी दिली आहे. ही परवानगी फक्त एका दिवसासाठी असेल. तसेच, आंदोलन सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी असेल, असे मुंबई पोलिसांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.
'आरपारच्या लढ्यास सज्ज'; महिनाभराची शिदोरी घेत मुंबईकडे निर्धाराने निघाले मराठा आंदोलक
या अटींचे पालन करावे लागेल
- आंदोलन आझाद मैदानातील राखीव जागेतच करावे लागेल.
- आंदोलनाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ असेल. त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही.
- आंदोलकांची कमाल संख्या ५,००० पर्यंत मर्यादित असेल.
- आंदोलकांची वाहने मुंबईत प्रवेश केल्यावर ईस्टर्न फ्री वे मार्गे वाडीबंदर जंक्शनपर्यंत येतील.
- आंदोलकांच्या मुख्य नेत्यांसोबत फक्त ५ वाहने आझाद मैदानापर्यंत जातील.
- इतर वाहने पोलिसांच्या निर्देशानुसार शिवडी, ए-शेड आणि कॉटनग्रीन परिसरात पार्क करावी लागतील.
- गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- परवानगीशिवाय ध्वनीक्षेपक किंवा गोंगाट करणाऱ्या उपकरणांचा वापर करता येणार नाही.
- आंदोलनादरम्यान अन्न शिजवण्यास किंवा कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे.
- आंदोलनात लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि वृद्ध व्यक्तींना सहभागी करू नये, असेही पत्रात नमूद आहे.