सरकार मराठ्यांचा छळ का करतंय?; मनोज जरांगे पाटील संतापले, मुख्यमंत्र्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:35 IST2025-01-23T16:35:03+5:302025-01-23T16:35:45+5:30
आम्ही १० टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय असा सवाल जरांगेंनी विचारला.

सरकार मराठ्यांचा छळ का करतंय?; मनोज जरांगे पाटील संतापले, मुख्यमंत्र्यांना इशारा
जालना - २६ जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून १ वर्ष पूर्ण होतंय, परंतु याची अंमलबजावणी करायला वर्षभर का लागला. गोरगरीब लेकरांचे प्रश्न का मार्गी लावला जात नाही. आमच्या लेकरांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही टाहो फोडतोय. गरीब मराठ्यांना किती राबावे लागते, आमची पोरं डॉक्टर, इंजिनिअर होऊ शकत नाही. आम्हाला आरक्षणाची गरज आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे मिळालीच पाहिजे. हैदराबाद, सातारा आणि बॉम्बे संस्थानचं मूळ गॅझेट लागू केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असं सांगत आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसीतूनच द्यावे अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी मनोज जरांगे पाटील यांची मुलाखत घेतली. त्यात मराठा आरक्षण आणि संतोष देशमुख प्रकरणावरून त्यांनी सरकारला इशारा दिला. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने दिलेले आरक्षण टिकणारं नाही. ते आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडते. ५० टक्क्यावरचं आरक्षण टिकणार नाही त्यामुळे आम्ही आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण मागतोय. १८८४ पासून आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. घर आमच्यावर नावावर आहे तुम्ही घुसलोय. एक दोन ओबीसींमध्ये अतातायीपणा आहे. SEBC आरक्षण तुम्ही दिले, विद्यार्थ्यांचे पहिले सत्र झाले, आम्ही हे आरक्षण मागितले नसताना ते सरकारने दिले. SEBC च्या अंतर्गत पोरांनी प्रवेश घेतले. आता त्या लाखो पोरांना शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप मिळत नाही. आता कॉलेज १०० टक्के फीस मागायला लागलेत असा आरोप त्यांनी केला.
त्याशिवाय तुम्ही मुलींना मोफत शिक्षण केले, कालच माझ्याकडे एक अर्ज आला. पुण्यातील वाघोलीतल्या कॉलेजनं एका मुलीला पत्र लिहून अद्याप मुलींना मोफत शिक्षणाची अंमलबजावणी झाली नाही असं कळवले. कोल्हापूरच्या भाजपा जिल्हाध्यक्षानेही पत्र देऊन मुलीचा प्रवेश रद्द करू नये असं कॉलेजकडे मागणी केली आहे. हा इतका बोगस प्रकार आहे. आम्ही १० टक्के आरक्षण मागितले नाही, ओबीसीतलं आरक्षण मागितले. कुणबी नोंदी शोधायचं काम बंद झाले, मराठ्यांचा छळ सरकार का करतंय, आमच्या हक्काचं आरक्षण दिले जात नाही असा निशाणा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर साधला.
दरम्यान, बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय म्हणून मराठे शांत बसले आहेत. आमच्याशी दगाफटका व्हायला लागलाय आणि सरकारमधील एक मंत्री सांभाळण्यासाठी खून पचवायचा आहे आणि आरोपी सुटले तर आम्ही रस्त्यावर येऊ. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही कुठलीही काटकसर करायची नाही. देशमुख कुटुंबीय देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर गेले. त्या कुटुंबावर अन्याय होणार नाही असं वाटतं. या धनंजय मुंडेंच्या टोळ्या आहेत त्यांना सांभाळण्याची गरज काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.