जरांगे-पाटील रोज भूमिका बदलतात, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही; अजय महाराज बारस्कर यांचे गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 03:40 PM2024-02-21T15:40:34+5:302024-02-21T15:41:00+5:30

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना कायद्याचं ज्ञान नाही, ते वारंवार भूमिका बदलतात, असा आरोप बारस्कर यांनी केला आहे. 

Manoj Jarange-Patil changes roles daily, they have no knowledge of law; Serious allegations of Ajay Maharaj Barskar | जरांगे-पाटील रोज भूमिका बदलतात, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही; अजय महाराज बारस्कर यांचे गंभीर आरोप

जरांगे-पाटील रोज भूमिका बदलतात, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही; अजय महाराज बारस्कर यांचे गंभीर आरोप

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने काल विधानसभेत एकमताने पारित केला. मात्र मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं यासाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदींच्या आधारावर मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीवर आपण ठाम असल्याचे सांगितले आहे. तसेच ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणासाठी नव्या आंदोलनाचीही घोषणा केली आहे. त्याच दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे एकेकाळचे सहकारी असलेल्या अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांना कायद्याचं ज्ञान नाही, ते वारंवार भूमिका बदलतात, असा आरोप बारस्कर यांनी केला आहे. 

आज मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे नव्या आंदोलनाला सुरुवात करण्याची घोषणा केली असतानाच दुसरीकडे अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर आरोपांची तोफ डागली. ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे सरकारकडे एकही निवेदन देत नाही. मात्र त्यांनी एक निवेदन माझ्यासमोर कॅमेऱ्यासमोर लिहून दिलं आहे. त्यांच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत त्या त्यांनी माझ्यासमोर लिहून दिल्या आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील हे  रोज पलटी मारतात. सातत्याने भूमिका बदलतात आणि नेहमी खोटं बोलतात, असा आरोप त्यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, जरांगे हे पारदर्शक आहेत, कॅमेऱ्यासमोर बोलतात. अधिकारी, मंत्र्यांसोबत दरडावून बोलतात,  म्हणून समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मराठा समाजाला खरं बोललेलं आवडतं, म्हणून समाजानं त्यांच्यावर प्रेम केलं. मात्र समाज फुटला  असा संदेश जाऊ नये म्हणून मी आतापर्यंत गप्प होतो, असेही अजय महाराज बारस्कर म्हणाले. 

बारस्कर पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी २३ डिसेंबर रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली. त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे. तिथे जरांगे पाटील आतमध्ये एक बोलले आणि बाहेर कॅमेऱ्यासमोर जाऊन दुसरंच बोलले. मी योग्यवेळी ते जाहीर करीन.  मुंबईला मोर्चा निघाला असताना रांजणगाव गणपती येथे पहाटे चार वाजता जरांगे पाटील यांनी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यासोबत जरांगे पाटील यांनी बैठक घेतली.  दोन तास मिटिंग झाली. या अधिकाऱ्याने त्या बैठकीची रेकॉर्डिंग करून ठेवली आहे. ते निवृत्त होतील लवकरच. त्यानंतर जरांगे पाटील यांचं बिंग फुटणार आहे. जरांगे पाटील हे पारदर्शक नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो, असेही ते म्हणाले. 

वाशीच्या मार्केटमध्ये जरांगे पाटील यांनी कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी  जायचं नाही, अशी घोषणा केली. तसेच आरक्षण मिळालं तरी आपण आझाद मैदानात जायचं असेही जरांगे पाटील म्हणाले होते. तेव्हा सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना १५ मिनिटांत अध्यादेश देतो, असे सांगितले खरंतर १५ मिनिटांत असा कुठलाही अध्यादेश निघत नाही. जरांगे पाटील यांना कायद्यातील काही कळत नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

Read in English

Web Title: Manoj Jarange-Patil changes roles daily, they have no knowledge of law; Serious allegations of Ajay Maharaj Barskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.