Manoj Jarange Patil News: परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा शवविच्छेदन रिपोर्ट हाती लागला असून, यात अंगावर काटा आणणारी माहिती समोर आली आहे. प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचे अहवालात नमूद आहे. पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावर जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे नमूद होते. यावरून पुन्हा एकदा बीडमधील गुन्हेगारीवरून विरोधक टीका करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणावरून आव्हान दिले आहे.
अलीकडेच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. महादेव मुंडे खून प्रकरणाची सविस्तर माहिती पत्नी ज्ञानेश्वरी व सतीश फड यांनी जरांगे पाटलांना दिली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना महादेव मुंडे कुटुंबीयांना तात्काळ वेळ द्यावी आणि या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी मान्य केली. तसेच, आरोपींना अटक करावे, अन्यथा केवळ बीड जिल्हाच नव्हे, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला. यानंतर आता पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी तीव्र भाषेत प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो की...
त्या मायमाऊलीला शंभर टक्के न्याय देणार. सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी, असे आवाहन करतो. एकदा तुम्ही फोटो पाहावेत. महाष्ट्रातील अठरा पगड जातीच्या लोकांना सांगतो, विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगतो. तुमचा भाऊ असता, तर तुम्ही फक्त फोटो पाहून दाखवा. फडणवीस यांना एकच आव्हान आहे की, कसा न्याय घ्यायचा ते आमचे आम्ही बघू. पण, मीडियासमोर येऊन तुम्ही सांगा की, ते फोटो पूर्ण पाहिले. महादेव भैय्या मुंडेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फक्त फोटो बघावा. त्यांच्या डोळ्यात पाणी आले नाही, असे जर घडले, तर तुम्ही सांगाल ते मी ऐकायला तयार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी २७ ऑगस्टपासून करोडोंच्या संख्येने मराठा मुंबईवर धडकणार असून, आरक्षण घेऊनच मी आणि मराठा बांधव परत येतील, असे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी नुकतेच सांगितले होते. सरकारकडे दोन वर्षांपासून शांततेत मागणी करूनही आरक्षणाची अंमलबजावणी केली नसल्याने मुंबईला येण्याची वेळ सरकारने आणली आहे. मुंबईत जागा पुरणार नाही एवढे मराठे येतील व मराठा बांधव आरक्षण आणि विजय घेऊनच परत येणार, चर्चेचा मार्ग आता नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला. २७ ऑगस्टपासून अंतरवाली ते पैठण मार्गे शेवगाववरून अहिल्यानगर, आळेफाटा मार्गे जुन्नर शिवनेरी येथे नतमस्तक होऊन माळशेज घाटातून कल्याण चेंबूरमार्गे मुंबईला जाणार असल्याची माहिती जरांगेंनी दिली.