माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 21:54 IST2025-12-17T21:52:31+5:302025-12-17T21:54:17+5:30
Manikrao Kokate Resignation: माणिकराव कोकाटेंना न्यायालयाने २ वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षा दिली आहे

माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
Manikrao Kokate Resignation: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज दिवसभर नाट्यमय घडामोडी घडल्या. राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मंगळवारी एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. त्यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले. त्यांना २ वर्षांचा कारावास आणि दंडाची शिक्षाही ठोठवण्यात आली. आज बुधवारच्या दिवशी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत शिक्षा रद्द करण्याची किंवा स्थगिती देण्याची विनंती केली. पण उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा, आमदारकीचा राजीनामा द्यावाच लागेल हे जवळपास निश्चितच होते. अखेर माणिकराव कोकाटे यांना मोठा दणका बसला. त्यांच्याकडे असलेली मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

माणिकराव कोकाटे यांच्याबाबत आज दिवसभर खूप चर्चा सुरू होती. त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचीही चर्चा होती. पण याचदरम्यान, ते नाशिक कोर्टात हजर राहिले नाहीत. उच्च न्यायालयात धाव घेताना त्यांनी तब्येतीचे कारण दिले. पण या साऱ्या गोंधळानंतर उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिली. तेथूनच माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद जाणार हे निश्चित होते. त्यानंतर ते लिलावती रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती देण्यात आली आणि त्यांनी सरेंडर होण्यासाठी चार दिवसांची मुदत मागितली. पण याचा कुठलाही फायदा झालेला दिसला नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवारांशी बैठक झाली होती. माणिकरावांची खाती कुणाला द्यायची असा सवाल बैठकीत चर्चिला गेल्याचेही सांगितले जाते. पण त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने, अखेर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सांगून माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खाती अजित पवारांकडे वर्ग केली आहेत.
अशा परिस्थितीत माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला आहे की नाही, याचा अद्याप अपडेट मिळालेली नाही. पण त्यांच्याकडे सध्या मंत्रिपदाचे कुठलेही खाते नाही. त्यामुळे ते सध्या बिनखात्याचे मंत्री असल्याचे दिसून येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल उच्च न्यायालयातील याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत जर त्यांच्यावरील दोषसिद्धीचा आरोप तसाच ठेवण्यात आला, तर मात्र त्यांच्याकडून राजीनामा घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.