माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:15 IST2025-12-18T17:24:12+5:302025-12-18T18:15:06+5:30
कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला.

माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
Manikrao Kokate: शासकीय सदनिकेसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती बुधवारी रात्री काढून घेण्यात आली होती. त्यानंतर कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी याबाबत माहिती देत कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला असल्याचे सांगितले.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात ॲड. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले होते. त्यानंतर बुधवारी रात्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा व अल्पसंख्याक विकास ही दोन्ही खाती उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपविण्यात आल्याचा आदेश राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी जारी केला. विरोधकांकडूनही कोकाटे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात होती. अशातच अजित पवार यांनी एक्स पोस्ट करुन माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचे जाहीर केले. तसेच कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास असल्याचेही अजित पवार म्हणाले.
"माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे," असं अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.
"सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू," असंही अजित पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.