Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:20 IST2025-12-17T12:18:05+5:302025-12-17T12:20:41+5:30
Manikrao Kokate Court Case: माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवत कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करून राजीनामा घेतला जाणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
Manikrao Kokate Case: 'क्रीडामंत्री नक्की कोणती मलाई मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांना पोहोचवताहेत किंवा यांचे असले काय कारनामे क्रिडामंत्र्यांना माहिती आहेत की गैरव्यवहार करूनही आपल्याला कोण हात लावू शकणार नाही, हा विश्वास मंत्री महोदयांना आहे', असा गंभीर आरोप करत महाविकास आघाडीचे नेते मंत्री माणिककराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहेत.
बनावट कागदपत्रे वापरून शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर या निर्णयाला स्थगिती मिळाली आणि त्यांचे मंत्रिपद वाचले. पण, जिल्हा न्यायालयाने आता कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली आहे.
यांचेही समर्थनच करणार का?
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच सवाल केला आहे.
दानवे मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणाले की, "सदनिका प्रकरणात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. लियोनेल मेस्सीला हे प्रताप ज्ञात असते तर कदाचित त्यानेही यांच्यासोबत दोन दिवसांपूर्वी फोटो काढला नसता. आता 'पारदर्शक' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्रिमंडळात काढून न्यायचा बाणा दाखवणार की लिलावात भाव पाडून आलिशान हॉटेल विकत घेऊ पाहणाऱ्या, महार वतनाच्या जमिनी उडवणाऱ्या, नजराणा चुकवणाऱ्या मंत्र्यांसारखे यांचेही समर्थनच करणार?", असा सवाल त्यांनी केला आहे.
या भ्रष्टाचारी मंत्र्याचा राजीनामा घेतील का ?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
"बनावट कागदपत्रे वापरून सदनिका लाटल्याप्रकरणी महायुती सरकारमधील क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली २ वर्षांची शिक्षा आता सत्र न्यायालयाने ही कायम ठेवली आहे. आता तरी लाजेखातर या भ्रष्ट महायुतीच्या सरकारचे आका मुख्यमंत्री आपल्या या भ्रष्टाचारी मंत्र्याचा राजीनामा घेतील का? या मंत्री महोदयांवर सरकारमधील भाऊ, दादा, भाईंचा एवढा कसला अंधविश्वास आहे की, यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला तरी चालतो, चालू विधिमंडळात ऑनलाईन पत्ते खेळलेलेही चालतात तसेच सरकारला चूना लावून सदनिका लाटलेल्याही चालतात", अशी टीका सपकाळ यांनी केली.
"क्रीडामंत्री साहेब नक्की कोणती मलई मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांना पोहोचवताहेत किंवा यांचे असले काय कारनामे क्रीडामंत्र्यांना माहिती आहेत की, गैरव्यवहार करूनही आपल्याला कोण हात लावू शकणार नाही, हा विश्वास मंत्री महोदयांना आहे. महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे, याचे हे ठळक उदाहरणच म्हणावे लागेल", असा गंभीर आरोप काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.
नाकाने कांदे सोलणारं हे सरकार त्यांना...
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
"बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेली २ वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम केल्यानंतर तरी आता सरकारने मंत्री माणिकराव कोकाटे यांची तातडीने पदावरुन हकालपट्टी करावी", असे रोहित पवारांनी म्हटले आहे.
"शेतकऱ्यांचा अवमान करुन झाला, ऑनलाईन पत्ते झाले आणि आता शासनालाच चुना लावल्याप्रकरणी शिक्षाही कायम झाल्याने कायम नैतिकतेच्या गप्पा हाणत नाकाने कांदे सोलणारं हे सरकार त्यांना आणखी किती दिवस वाचवतंय हेच बघायचंय… माझा न्याययंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं माझ्या विरोधात कोकाटे यांनी दाखल केलेला कथित मानहानीचा दावाही न्यायालय असाच फेटाळून लावेल", असा विश्वासही रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.