अश्लील मेसेजद्वारे आमदाराकडून दहा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: October 13, 2025 20:48 IST2025-10-13T20:48:39+5:302025-10-13T20:48:49+5:30
Thane Crime News:

अश्लील मेसेजद्वारे आमदाराकडून दहा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
- जितेंद्र कालेकर
ठाणे - काेल्हापूरच्या चंदगढचे आमदार शिवाजी पाटील यांना व्हॉटसअॅपवरून अश्लील फाेटाे पाठवून त्यांच्याकडून दहा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहन ज्योतिबा पवार (वय २६ वर्षे, रा. मांडीदुर्ग, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळचे पाेलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी साेमवारी दिली. त्याला १५ ऑक्टाेंबरपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
गेल्या वर्षभरापासून पाटील यांना ताे एका महिलेच्या आवाजात फाेन करुन त्यांना बाेलण्यात गुंतवित हाेता. त्यानंतर त्यांना अश्लील मेसेज, फाेटाे आणि व्हिडिओ पाठवून त्यांच्याकडे त्याने दाेन वेगवेगळया माेबाईल क्रमांकावरुन पाच ते दहा लाखांची मागणी केली. सावध झालेल्या पाटील यांनी याप्रकरणी ठाण्यातील चितळसर पाेलीस ठाण्यात अज्ञात आराेपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलमा सह खंडणीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता. पाेलीस आयुक्त आशुताेष डुंबरे, सह पाेलीस आयुक्त डाॅ. ज्ञानेश्वर चव्हाण आणि उपायुक्त कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनिल वरुडे, उपनिरीक्षक अतुल जगताप आणि हवालदार राजाराम पाटील यांच्या पथकाने आराेपीने केलेल्या दोन्ही मोबाईल क्रमांकांचे सीडीआर आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मोहन याला काेल्हापूरच्या चंदगढमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने या गुन्हयाची कबूलीही दिल्यानंतर त्याला अटक केली.
आराेपी माेहन हा चंदगढचा रहिवासी असून त्याने लाेणावळयातील एका हाॅटेलमध्ये वेटरचे काम केले. हे काम एप्रिल २०२५ मध्ये सुटल्यानंतर ताे तृतीय वर्ष विज्ञानच्या परिक्षेसाठी गावी परतला हाेता. बेराेजगार असल्याने ताे नाेकरी मागण्यासाठी आमदार शिवाजी पाटील यांच्या घरी गेला हाेता. त्यावेळी त्यांनी त्याला काही खायला दिले आणि माेबाईल क्रमांकही दिला. नंतर त्याने त्याच माेबाईलवर पाटील यांना मेसेज आणि फाेटाे पाठवून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बॅंक खात्यात अवघे दाेन हजार २०० रुपये असल्याचीही माहिती चाैकशीत उघड झाली. त्याने त्याच्याच नातेवाईक महिलेच्या आधारकार्डमधील फाेटाेचा परस्पर वापर केला. तिला याची माहितीही नसल्याचे चाैकशीत समाेर आल्याचे पाेलिसांनी सांगितले.