Shivaji Maharaj Statue Collapse मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 13:14 IST2024-08-28T12:57:14+5:302024-08-28T13:14:16+5:30
Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील ज्या राजकोट किल्ल्यावर ही दुर्घटना घडली तिथे आज राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झाला.

Shivaji Maharaj Statue Collapse मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने-सामने
शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे राज्यात संतापाची लाट आहे. तसेच सर्वपक्षीय नेते दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत आहेत. दरम्यान, मालवणमधील ज्या राजकोट किल्ल्यावर ही दुर्घटना घडली तिथे आज राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झाला. राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आज आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महाविकास आघाडीचे नेते आले होते. त्याचवेळी स्थानिक खासदार आणि भाजपा नेते नारायण राणे हे त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोहोचले होते. यादरम्यान, दोन्ही गट किल्ल्यामध्ये आमने सामने आले आणि वादाची ठिकणी पडली.
राजकोट किल्ल्यामध्ये ठाकरे गट आणि राणे समर्थक आमने सामने आल्यानंतर पोलिसांकडून दोन्ही गटांना रोखण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र दोन्हीकडचे कार्यकर्ते पोलीस यंत्रणेला न जुमानता एकमेकांवर धावून गेले. यावेळी काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली. तसेच किल्ल्यामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं असताना भाजपा नेते निलेश राणे यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमक झाली. तर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दमदाटी केली.
दरम्यान, राजकोट किल्ल्यामध्ये भेट देत असताना भाजपा नेते नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट झाली होती. तसेच दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलनही केले होते. त्यानंतर नारायण राणे गडावर पाहणीसाठी पोहोचले. मात्र काही वेळात आदित्य ठाकरे यांचंही राजकोट किल्ल्याच्या परिसरात आगमन झालं. त्यानंतर राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू झाली. तर आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यात प्रवेश देणार नाही, अशी भूमिका घेतली. तर १५ मिनिटांत वाट मोकळी केली नाही तर आम्ही किल्ल्यात घुसू, असा इशारा ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी दिला. मात्र घोषणाबाजी आणि धक्काबुक्कीमुळे वातावरण अधिकच चिघळलं. दोन्ही गटांमध्ये वादावादी सुरू असताना जयंत पाटील यांनी दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.