ऑनलाइन लोकमत
धामणगाव बढे (बुलडाणा), दि. 08 - एक पिसाळलेले माकड, त्याला पकडण्यासाठी आलेले वनविभागाचे दहा कर्मचारी अन त्यांच्यामागे असलेले सर्व गावकरी, हे चित्र होते.
धामणगाव बढे गावातील. सोमवारी दुपारी एका पिसाळलेल्या माकडाने धामणगाव बढे येथील १७ ग्रामस्थांना चावा घेतला. या माकडाने विविध भागात मागील तीन दिवसापासून हैदोस घातला. सोमवारी वनविभागच्या कर्मचा-यांना रेस्क्यू
आॅपरेशन करून पिसाळलेल्या माकडाला पकडण्यात यश आले.
मागील तीन दिवसांपासून माकडाने केलेल्या उच्छादामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी आपल्या स्तरावर वानराला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र मर्कटलीलानी अख्खे गाव जेरीस आणल्यामुळे तीसºया दिवशीही गावात दहशत पसरली. परिणामी विद्यार्थी शाळेत जावू शकले नाही. शेवटी पं. स. सदस्य रामदास चौथनकर
यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. माहित पडताच वन विभागाचे कर्मचारी मिसाळकर, सुरोशे, कुशोडे यांनी येवून वानराला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. शेवटी मोताळा येथून वनविभागाच्या सर्व कर्मचाºयांना रेस्क्यू आॅपरेशनसाठी पाचारण करण्यात आले. माक डाला पकडण्यासाठी ट्रँक्विलायझर गन घेवून दोन वेळेस सेटिंग करण्यात आली. तरीही माकडाने आॅपरेशर फ्लॉप करीत गावाबाहेर पळ काढला. शेवटी तीन तासांच्या अथक प्रयत्नांनतर माकड दिसताच वनपाल संजय राठो्रड यांनी गनद्वारे नेम धरून माकडावर निशाना साधला. मात्र इंजेक्शन शरीरात घुसताच पिसाळलेल्या
माकडाने संजय राठोड यांच्यावरच हल्ला चढविला व पळत सुटले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. त्यानंतर काही अंतरावर जावून माकड शांत झाले. या रेस्क्यू आॅपरेशनसाठी वनविभागाचे सरनाईक, संजय राठोड, कांबळे, वाघ, खरे, मिसाळकर,
सुरोशे, कुशोड, बुडनखाँ हैदरखाँ यांनी प्रयत्न केले.यावेळी पुंडलीक मिस्तरी, महेमुद खाँ, रशीद पटेल, जुबेर पटेल, ग्रा. प. सदस्य गजानन घोंगडे, रियाज पटेल आदी ग्रामस्थांनी मदत केली. पिसाळलेल्या वानरावर मोताळा येथे उपचार करून बोथा जंगलात सोडणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.