‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:15 IST2025-12-17T18:14:56+5:302025-12-17T18:15:26+5:30
Nana Patole News: विमानात सध्या हिंदी व इंग्रजी भाषेत उद्घोषणा केली जाते, यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच विमानातून मराठीची उद्घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.

‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी
मुंबई - केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच घेतलेला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील मराठी भाषिकांच्या भावना गौरवण्यात आल्या आहेत. हा निर्णय मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा सन्मान आहे. विमानात सध्या हिंदी व इंग्रजी भाषेत उद्घोषणा केली जाते, यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच विमानातून मराठीची उद्घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात नाना पटोले पुढे म्हणतात, मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूरसह इतर शहरात येणाऱ्या विमानांमध्ये मराठीतून उद्घोषणा करण्यात यावी, यामुळे मराठी भाषेच्या संवर्धन व प्रसाराला चालना मिळेल तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना मराठी संस्कृती व भाषेची ओळख होईल, असे पटोले यांनी म्हटले आहे.