Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 18:25 IST2025-10-21T18:22:03+5:302025-10-21T18:25:56+5:30
मुंबईचे माजी उपमहापौर व भाजपा नेते अरुण देव यांच्या अंधेरी पश्चिम येथील घराला आग लागली.

Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
मुंबई: मंगळवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास मुंबईचे माजी उपमहापौर व भाजपा नेते अरुण देव यांच्या अंधेरी पश्चिम येथील प्रथमेश हाऊसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील बी/११०२ फ्लॅटमध्ये फटाक्याच्या एका रॉकेटने भीषण आग लागली. फटाक्याचे रॉकेट त्यांच्या फ्लॅटच्या बेडरूमच्या बाल्कनीवर आदळला आणि त्याच ठिकाणी ठेवलेल्या एसी युनिटला आग लागली. या आगीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकला होता. परंतु, समयोचित मदतीमुळे मोठे नुकसान टळले. आग विझवण्यासाठी सुरक्षा रक्षक आणि शेजाऱ्यानी तत्काळ मदत केली. या घटनेमुळे, सोसायटीमध्ये फटाक्यांच्या वापराबाबत कडक नियमांची आवश्यकता उभी राहिली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
सामाजिक दृष्टीकोनातून, फटाक्यांच्या वापरासाठी कडक नियम करून त्यात फटाक्यांचे प्रकार आणि वापराच्या वेळेची मर्यादा ठरवण्यात यावी.मध्यरात्री नंतर फटाक्यांचे वापर थांबवावे. धोकादायक फटाक्यांचे वापर पूर्णपणे बंद करावे.नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सोसायटीत एक अधिकारी नियुक्त करावा.धोका निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी तातडीच्या कारवाईची मागणी देव यांनी या सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांकडे केली आहे.यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखिल निवेदन दिले असून त्यांची तवकर भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे अशी घटना टाळण्यासाठी सर्व सोसायटी सदस्यांनी या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.