छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 14:35 IST2025-10-10T14:31:59+5:302025-10-10T14:35:22+5:30
Ashutosh Nikalje joins Shiv Sena UBT: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

छोटा राजनचा धाकटा भाऊ ठाकरेंच्या शिवसेनेत, प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याच अनुषंगाने आज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (निकाळजे गट) नेते आशुतोष निकाळजे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. 'मातोश्री' निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आशुतोष निकाळाजे यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. निकाळजे गटाच्या या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकण पट्ट्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी बळ मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे कौतुक केले. "संघर्षाच्या काळात खरी शिवसेना काय आहे, हे तुम्ही दाखवून देत आहात, याचा मला अभिमान आहे", असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत, खरी देशभक्ती आणि खरं हिंदुत्व काय आहे, हे लोकांना समजावून सांगण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मातोश्री, मुंबई येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. pic.twitter.com/Ia2KdObEUP
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 10, 2025
उद्धव ठाकरे यांनी जाहिरातबाजीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली. शहरातील अनेक चौकांमध्ये आणि रस्त्यांवर बॅनरबाजी दिसत असल्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, जाहिरातबाजीची ही सगळी धूळफेक सुरु आहे. कामं केली तर प्रसिद्धीची गरज लागत नाही, लोक स्वतःहून दाद देतात. कामाची दखल घेतात. पण ती वृत्ती यांच्याकडे राहिली नाही, त्यामुळेच यांना पोस्टरबाजी करायची आहे."