Chhgan Bhujbal Mahayuti: मंत्रिपदाअभावी पाच महिने बाहेरच राहणाऱ्या छगन भुजबळ यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने संधी दिली. यातून भुजबळ यांना विरोध करणाऱ्या शिंदेसेनेलाही धक्का दिला. मात्र, आता शिंदेसेनेही येवल्यातील भुजबळ यांचे विरोधक आणि विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना पक्षात प्रवेश देऊन काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे. दराडे यांच्या प्रवेशाप्रसंगीच उभयंतात जो कलगीतुरा रंगला तो बघता महायुतीतच संघर्षाची नांदी पाहण्यास मिळणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुळात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू शिक्षक आमदार किशोर दराडे हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. हाच राजकीय पटलावर चर्चेचा विषय होता.
आता ही राजकीय विसंगती दूर करण्यासाठी दोन्ही बंधूंनी घर आणि पक्ष एकत्र ठेवला आहे. शुक्रवारी (२३ मे) रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नरेंद्र दराडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याला भुजबळांना शह देण्याचेच राजकारण अधिक कारणीभूत आहे.
भुजबळ विरुद्ध शिंदेंची शिवसेना ?
छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत नांदगाव मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी केली होती. त्यावेळी हा संघर्ष अधिकच वाढला.
त्याआधी लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचाही पराभव झाला होता. त्यामुळे या सर्वांनीच भुजबळ यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली.
आमदार कांदेंनी घेतले होते श्रेय
भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी याचे श्रेय घेण्याचा दावा केला होता. मात्र, आता भुजबळ यांना पुन्हा संधी मिळाली. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिंदेंच्या शिवसेनेला चाप लावल्याचे बोलले जात आहे.
अशावेळी येवल्यात भुजबळ यांना नेहमीच आव्हान देणाऱ्या नरेंद्र दराडे यांना शिंदेसेनेने आपलेसे करून काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे.
आगामी संघर्षाची नांदी
नरेंद्र दराडे यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने छगन भुजबळ यांनी सत्तेसाठी कुठेही जाणारे ते असल्याची टीका केली तर भुजबळ यांनीही सत्तेसाठी पाच पक्ष बदलले असल्याचा दावा करीत दराडे यांनी ही संघर्षाची नांदी असल्याचे दाखवून दिले.