भविष्यात महाराष्ट्र बनेल औद्योगिक क्षेत्राचे हब, उद्योगमंत्री उदय सामंत याचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 06:47 IST2025-01-04T06:46:12+5:302025-01-04T06:47:00+5:30
भविष्यात महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राचे हब बनेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ठाण्यात केले.

भविष्यात महाराष्ट्र बनेल औद्योगिक क्षेत्राचे हब, उद्योगमंत्री उदय सामंत याचे प्रतिपादन
ठाणे : महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यावर रिझर्व्ह बँकेने केलेल्या सर्वेक्षणात एक लाख १३ हजार २३६ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एकवर गेला आहे. भविष्यात महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राचे हब बनेल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ठाण्यात केले.
ठाण्यातील एका संस्थेने आयाेजित केलेल्या बिझनेस जत्रेचे सामंत आणि ठाण्याचे खा. नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. सामंत म्हणाले की, राज्यातील लघुउद्योजकांना ताकद देण्यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे. उद्योजक निर्माण करण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. त्यासाठी पहिला उद्योजकांचा मराठी मेळावा नाशिकमध्ये घेतला जाईल. त्याला उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग पूर्ण सहकार्य करेल, असेही सामंत यांनी जाहीर केले. ज्या ठिकाणी एमआयडीसी होईल त्या ठिकाणी २० टक्के जागा सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगासाठी राखून ठेवली जाईल, अशी घाेषणा त्यांनी केली. त्यासाठी आम्ही भाडे कमी आकारून दहा वर्षांची योजना बनवू. त्यातून स्थानिक उद्योजक मोठा होईल, असेही ते म्हणाले.
टाटा स्कील सेंटर १५० कोटी रुपयांतून गडचिरोलीमध्ये टाटा सीएसआर फंडातून तीन महिन्यांत सुरू केले. रत्नागिरीमध्ये पाच हजार मुलांना शिकवणारे स्कील सेंटर रत्नागिरीमध्ये टाटा सीएसआर फंडातून सुरू झाले. पुणे, कल्याण-डोंबिवलीमध्येही सुरू करत आहोत. आशिया खंडातील सगळ्यात मोठे उद्योग भवनाला रतन टाटा यांचे नाव देण्याचे ठरवले आहे. तसेच सगळ्या स्कील सेंटरला टाटा स्कील सेंटर हे नाव देणार आहे.
उद्योजकांनी या स्कील सेंटरसोबत टायअप करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अशोक दुगडे आदी उपस्थित हाेते.