"महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन होता, आहे आणि यापुढेही राहील"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 08:52 PM2021-10-05T20:52:47+5:302021-10-05T20:53:14+5:30

Jayant Patil : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीजच्यावतीने आज वालचंद स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

"Maharashtra was, is and will continue to be the engine of development of the country" - Jayant Patil | "महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन होता, आहे आणि यापुढेही राहील"

"महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन होता, आहे आणि यापुढेही राहील"

Next

मुंबई :  महाराष्ट्र पूर्वीपासूनच भारताच्या विकासाचे इंजिन होता, आहे आणि यापुढेही राहील असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केले. दरम्यान विकासाची गती वाढविण्यासाठी आपल्या सर्वांनाच कार्यक्षमता आणखी वाढवावी लागणार आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीजच्यावतीने आज वालचंद स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  यामध्ये 'महाराष्ट्र भारताच्या विकासाचे इंजिन' या विषयावर जयंत पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष ललित गांधी, आशिष पेडणेकर, अनिलकुमार लोढा, शुभांगी तिरोडकर, रवींद्र माणगावे, संजय दादलिया आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच महाराष्ट्र देशाच्या विकासाचे इंजिन राहिला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थितीचा लाभ मिळत होता. मुंबई बंदर विकसित असल्याने परदेशी गुंतवणूकदार मुंबईस प्राधान्य देत असत. पण आता देशाच्या अनेक शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळे झाली आहेत. त्यामुळे देशाच्या इतर राज्यात गुंतवणूक होत आहे. मात्र तरीही आज परकीय आणि देशी गुंतवणूकदारांची महाराष्‍ट्रालाच पसंती असते आणि भविष्यात राहिल असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

राज्याच्या विकासालाच आणखी गती मिळण्यासाठी बंदरांची संख्या वाढायला हवी. वाढवण आणि विजयदुर्ग येथील बंदरे पूर्ण व्हायला हवीत. यामुळे विकासाला आणखी गती मिळेल. राज्यातील काही जिल्ह्यात औद्योगिकीकरण झालेले नाही. तिथे उद्योग यावेत यासाठी उद्योजकांना काही सवलती देणे आवश्यक आहे. कामगार कायद्यात कालसुसंगत बदल करण्याची आवश्यकता आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राज्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी शासन विविध पायाभूत सुविधा राबवित आहे. यातून विविध शहरांचे मुंबईपासून अंतर आणि संपर्काचा कालावधी कमी होत आहे. त्यामुळे विकासाला आणखी गती मिळेल,  असेही जयंत पाटील यांनी सांगितले. उद्योजक आणि संशोधन संस्था यांनी एकत्रित येऊन समस्यांवर विचार करावा. त्यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत शासनाला प्रस्ताव द्यावा, असेही जयंत पाटील म्हणाले.

प्रास्ताविक ललित गांधी यांनी केले. रवींद्र माणगावे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेठ वालचंद हिराचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते काही उद्योजकांचा आणि नूतन नियोजित अध्यक्ष ललित गांधी आणि मावळते अध्यक्ष संतोष मंडलेचा यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: "Maharashtra was, is and will continue to be the engine of development of the country" - Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.