महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेवर उद्धव ठाकरे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 15:30 IST2019-11-03T15:17:24+5:302019-11-03T15:30:15+5:30
Maharashtra Election Result 2019: उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला

महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेवर उद्धव ठाकरे म्हणतात...
औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात 'मी पुन्हा येईन' कविता सादर केली होती. त्यानंतरच्या अनेक सभांमध्येही फडणवीस यांनी 'मी पुन्हा येईन' असं म्हणत आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ असा विश्वास व्यक्त केला होता. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी औरंगाबादमध्ये टोला लगावला. उद्धव ठाकरेंनी आज अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना संबोधित केलं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झाल्याचं ते म्हणाले. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीए. पाऊस जाताना 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' म्हणतोय. यामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे, असं ठाकरे म्हणाले. राज्यातील सत्तेचा तिढा केव्हा सुटेल, यावर थेट भाष्य करणं त्यांनी टाळलं. शेतकऱ्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अशा परिस्थितीत आपण सत्ता स्थापनेचा विचार करणार असू तर आपण निर्घृण आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मला शेतीतलं फारसं कळत नाही. पण काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत अतिशय अपुरी असल्याचं उद्धव यांनी म्हटलं. 'शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत द्या. यातून तो पुढच्या हंगामाची तयारी करू शकेल. शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक बाबींचा फारसा विचार करू नका. बळीराजाला माणुसकीच्या नात्यानं मदत करा आणि मग निकषांच्या फुटपट्ट्या लावा,' असंदेखील ते पुढे म्हणाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रानं पुढाकार घ्यावा. यासाठी प्रशासनानं कागदी घोडे नाचवू नयेत, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.