महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार का?; भुजबळ म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:19 IST2019-10-24T13:18:32+5:302019-10-24T13:19:07+5:30
Maharashtra Election Result 2019 भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता धूसर

महाराष्ट्र निवडणूक निकालः शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार का?; भुजबळ म्हणतात...
नाशिक: विधानसभा निवडणुकीचा निकाल पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होईल. सध्या राज्यात भाजपा पहिल्या क्रमांकावर असल्याचं दिसत आहे. मात्र भाजपा स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची शक्यता कमीच दिसत आहे. त्यामुळे सत्तेचा सोपान गाठण्यासाठी भाजपाला शिवसेनेची गरज लागेल. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत मतमोजणी आणि सध्याच्या कलांवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित सरकार स्थापणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान भुजबळ यांनी केलं. याआधी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील अशाच आशयाचं ट्विट केलं आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे ही काँग्रेस पक्षाची प्राथमिकता असेल, असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
छगन भुजबळांनी काँग्रेसच्या प्रचाराबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसनं प्रचारात आघाडी घेतली असती तर फायदा झाला असता, असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्यात राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं असून आघाडीची कामगिरीदेखील चांगली झाल्याचं ते म्हणाले. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीनं पुनरागमन केलं आहे. जिल्ह्यात 6 जागा राष्ट्रवादीला मिळतील. काँग्रेसलाही 2 जागांवर यश मिळेल, असं भुजबळ म्हणाले. भाजपाच्या काही जागा आम्ही जिंकू, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.