Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. सुरुवातीच्या चार तासांत हाती आलेल्या कलांनुसार, भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. महायुतीला २८८ पैकी २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाल्याचे चित्र दिसत आहे. या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही, असे संजय राऊत म्हणाले. तसेच, 'मत पत्रिकेवर पुन्हा निवडणुका घ्या. असा निकाल लागूच शकत नाही,' अशा शब्दांत राऊतांनी रोखठोक मत व्यक्त केले. त्यांच्या या प्रतिक्रियेवरून महायुतीच्या नेतेमंडळींनी त्यांची खिल्ली उडवली.
महायुतीच्या विजयात राऊतांचा सिंहाचा वाटा
"संजय राऊत यांचे धन्यवाद. महायुतीचा जो विजय झाला आहे, त्यात संजय राऊतांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आतापर्यंत जी बडबड केली त्यामुळे महायुतीचा विजय झाला. त्यांनी गेली ५ वर्षे तथ्यहीन, बाष्फळ बडबड केली. आता निकाल हाती आल्यानंतरही ते म्हणत आहेत की आम्हाला हा कल मान्य नाही. लोकसभेला तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या, पण आता त्यांना हा जनतेचा निकाल वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं मला वाटतं. माझी अशी विनंती आहे की त्यांना तात्काळ वेड्यांच्या इस्पितळात दाखल करण्यात यावे," अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली.
राऊतांची रुदाली झाली
"संजय राऊत हे विचित्र भूमिकेत आहेत. काल ते सांगत होते की आम्ही आज संध्याकाळी मुख्यमंत्री जाहीर करू. ज्या पद्धतीने ते रडत आहेत त्याला रूदाली यापेक्षा दुसरा कुठलाही शब्द नाही. यश-अपयश येतच असतात. भाजपाने यापेक्षा मोठं अपयश बघितलं आहे. त्यामुळे या गोष्टी स्वीकारायच्या असतात. असे अपयश पचवायचे असते आणि त्या अपयशातून शिकायचे असते. ते आता जी रडारड करत आहेत, आकांडतांडव करत आहेत त्यातून एवढंच म्हणू शकतो की संजय राऊतांची रुदाली झाली," असे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.
महायुतीच्या विजयाचे शिल्पकार हे संजय राऊतच
"महायुतीच्या विजयाचे शिल्पकार हे संजय राऊतच आहेत. ऊर बडवण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. कालपासून त्यांनी जी हॉटेल्स बूक केले होते, जी विमाने बूक केली होती, तो सर्व खर्च वाया जाताना दिसतोय. महायुतीच्या विजयाचे शिल्पकार संजय राऊत यांना मी मनापासून धन्यवाद देतो", अशा शब्दांत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी खिल्ली उडवली.