Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:08 PM2019-10-02T13:08:22+5:302019-10-02T13:10:48+5:30

चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानं कोथरुडमध्ये रंगलं राजकारण

Maharashtra Vidhan Sabha 2019 Disappointed Medha Kulkarni to campaign for Chandrakant Patil in Kothrud Constituency | Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

Vidhan Sabha 2019: 'राज ठाकरे, जयंत पाटलांनी तिकिटाची ऑफर दिली, पण...!'; मेधा कुलकर्णी झाल्या भावुक

Next

पुण्यातील कोथरुड विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू झाल्याचं चित्र गेल्या दोन दिवसांपासून पाहायला मिळतंय. विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून भाजपानं पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यावरून कोथरुडमध्ये राजकारण रंगताना दिसतंय. ब्राह्मण महासंघानं चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला केलेला विरोध, आयात केलेला उमेदवार नको, अशा आशयाचे काही स्थानिकांनी लावलेले बॅनर्स, चंद्रकांत पाटील यांना शह देण्यासाठी सर्व विरोधकांच्या सुरू असलेल्या हालचाली, अशा लक्षवेधी घडामोडी या मतदारसंघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर, मावळत्या आमदार मेधा कुलकर्णी नाराज असल्याचीही चर्चा आहे. परंतु, घराघरात जाऊन, सोसायट्यांमध्ये फिरून, सर्व जाती-धर्माच्या लोकांना भेटून आपण चंद्रकांत पाटील यांचाच प्रचार करू, अशी भूमिका मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केली आहे. अर्थात, त्यांना आतून होत असलेलं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. 

भाजपानं उमेदवारी नाकारल्याचं कळताच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मला फोन केला. त्यावेळी मी मुंबईत होते. पुण्याला पोहोचेपर्यंत तुमच्याकडे एबी फॉर्म पाठवतो, असं त्यांनी सांगितलं. पण मी नकार दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मला तिकिटाबाबत विचारणा केली. परंतु, मी भाजपाची एकनिष्ठ कार्यकर्ती असून यापुढेही पक्षाचंच काम करेन, असं मेधा कुलकर्णी यांनी नमूद केलं. उमेदवारी कुणाला द्यायची हा पक्षाचा निर्णय आहे, हे सांगतानाच, हा निर्णय कळवण्याचं सौजन्यही न दाखवल्यानं त्या भावूक झाल्याचं 'एबीपी माझा'च्या मुलाखतीत पाहायला मिळालं.

कोथरुडमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या जास्त आहे. मात्र मी कधीच जातीनिहाय काम केलं नाही, असं कुलकर्णी यांनी सांगितलं. आधी पुण्यात भाजपाचे फारसे नगरसेवक नव्हते. तेव्हा भाजपाचं फारसं प्राबल्य नसलेल्या वॉर्डातून मी तीनदा निवडणूक लढवली. मी माझ्या कार्यशैलीनं अनेकांना पक्षाशी जोडलं. त्यामुळे आधी कधीही भाजपाचं काम न केलेली माणसं त्यामुळे पक्षात आली. मी लोकांसाठी भांडते. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. त्यामुळे अनेकांना भाजपा जवळचा वाटू लागला, असं कुलकर्णी म्हणाल्या. 

पक्षानं उमेदवारी दिली नसली, तरी निवडणुकीत पूर्ण ताकदीनं प्रचारासाठी उतरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. पक्षानं दिलेल्या उमेदवारासाठी मी घराघरात जाईन, सोसायट्यांमध्ये जाईन. हाच पक्ष न्याय देऊ शकतो, हे मतदारांना सांगेन. यासाठी मी ब्राह्मण महासंघाच्याही संपर्कात असल्याचं त्या म्हणाल्या. माझ्या मतदारसंघात सर्व जातीधर्माचे लोक राहतात आणि ते फक्त माझे फक्त मतदार नाहीत, तर नातेवाईक आहेत, असं म्हणत असताना कुलकर्णी अतिशय भावूक झालेल्या दिसल्या.

तुम्हाला कार्यकर्ता मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे का, या प्रश्नाला थेट उत्तर देणं त्यांनी टाळलं. 'कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी पक्षाचा निर्णय आहे. मी पक्षाची सदस्य असल्यानं मेळाव्याला उपस्थित असेन,' असं त्या म्हणाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा कुलकर्णी यांना मेळाव्याचं आमंत्रण आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी नाही, असं उत्तर दिलं. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात नाराजी स्पष्ट दिसत होती.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Disappointed Medha Kulkarni to campaign for Chandrakant Patil in Kothrud Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.