Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 10:34 IST2021-07-30T10:06:13+5:302021-07-30T10:34:38+5:30
२५ जिल्ह्यांतील सर्व दुकाने, आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची शिफारस, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत

Maharashtra Unlock: राज्यातील लोकांना मोठा दिलासा; ११ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात निर्बंध शिथिल
अतुल कुलकर्णी
मुंबई : राज्यात ११ जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या नियंत्रणात येईपर्यंत, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवले जातील. मात्र, उर्वरित २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची शिफारस सार्वजनिक आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या २५ जिल्ह्यांतील सर्व दुकाने, आस्थापना रात्री ८ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची शिफारसही करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर हे निर्णय अमलात येतील, असे सांगून टोपे यांनी उशिरात उशिरा सोमवारपर्यंत महाराष्ट्राला दिलासा मिळेल, असेही स्पष्ट केले.
मुंबईच्या ‘लोकमत’ कार्यालयात टोपे यांनी भेट दिली. त्यावेळी दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, आज आपण जपानचे कौन्सिल जनरल यांच्याशी चर्चा केली. जपानमध्ये आत्तापर्यंत चार लाटा येऊन गेल्या. पाचवी लाट त्यांच्याकडे मोठी आहे. एकाच दिवशी त्यांच्याकडे दहा हजार रुग्ण निघाले आहेत. याचा तपशिल विचारला असता ते म्हणाले, ऑलिम्पिकमुळे आमच्याकडे दहा हजार रुग्ण वाढले, असा प्राथमिक अंदाज आहे. ज्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी रुग्ण वाढतात, असा अंदाज आहे. ऑलिम्पिकमुळे जपानमध्ये वाढलेले रुग्ण, मुंबईत लोकल सुरू करण्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. त्यामुळे लोकल सुरू करण्याविषयी विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्याला नव्याने अर्थचक्र सुरू ठेवावे लागेल. यावरही विस्तृत चर्चा झाल्याचे टोपे यांनी एका प्रश्नावर सांगितले.
केंद्राकडून जास्तीचे डोस मिळावेत
महाराष्ट्राला लसीचे जास्तीत जास्त डोस मिळावेत, यासाठी आपण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याशी समक्ष बोललो. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे, की तुम्ही आमच्या सोबत दिल्लीला चला. मात्र, महाराष्ट्राला जास्तीत जास्त डोस मिळवून द्या. महाराष्ट्राला जर महिन्याला तीन कोटी असे सहा कोटी डोस दोन महिन्यात मिळाले तर आपण दहा कोटी जनतेचे लसीकरण पूर्ण करू, असेही टोपे यांनी सांगितले. बारा कोटीच्या महाराष्ट्रात आपण साडेचार कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे.
ऑगस्ट अखेरीपर्यंत काळजी आवश्यक
आता आपण अशा टप्प्यावर आहोत, की जर आपण काळजी घेतली नाही तर रुग्ण संख्या वाढू शकते. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री वेगवेगळ्या डॉक्टरांशी तसेच टास्क फोर्सच्या सदस्यांशी सतत बोलत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेतली. कशा पद्धतीने लोकलसेवा सुरू करता येईल, यावर त्यांची चर्चा झाली, असेही टोपे यांनी सांगितले.
काय आहेत शिफारशी ?
- सर्व खासगी आस्थापनांना ५०% टक्के उपस्थितीची परवानगी द्यावी.
- लग्न समारंभ, मृत्यू, नाटक - सिनेमा या सगळ्या गोष्टींसाठी आता उपस्थितीच्या संख्येवर असणारे निर्बंध शिथिल केले जातील.
- नाटक सिनेमांसाठी ५०% उपस्थितीची परवानगी.
- न्यू नॉर्मल या पद्धतीचे आयुष्य आता कोरोनासोबत जगावे लागेल. त्यासाठी मास्क न वापरणाऱ्या लोकांना कठोर दंडाची शिफारस.
- मास्क, सॅनिटायझर या गोष्टी अनिवार्य असतील.
या जिल्ह्यांतील निर्बंधात शिथिलता येणार
मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम.
येथे निर्बंध कायम कारण...
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, त्यासोबत कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि अहमदनगर, बीड या ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध एवढ्या लवकर कमी केले जाणार नाहीत. या ठिकाणची रुग्णसंख्या कमी झाल्यानंतरच निर्बंध शिथिल केले जातील, असेही आरोग्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
ज्यांना लसीकरणाचे दोन डोस देण्यात आले आहेत, त्यांच्यासाठी मुंबईत लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, या विषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री ठाकरे टास्क फोर्सच्या सदस्यांशी बोलून घेतील. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री
पाहा व्हिडिओ -