Maharashtra Politics : "हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे...", जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 21:45 IST2025-03-26T21:44:41+5:302025-03-26T21:45:50+5:30
Maharashtra Politics : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपले आहे. आज शेवटचा दिवस होता.

Maharashtra Politics : "हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे...", जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल
Maharashtra Politics ( Marathi News ) : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. हे अधिवेशन अनेक मुद्द्यावर गाजले. दरम्यान, या अधिवेशनावरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. “हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे होते, या अधिवेशनात बाकी काहीच नव्हते,” असा निशाणा पाटील यांनी महायुतीवर साधला.
अधिवेशन संपल्यानंतर विधानभवनातील विधानसभेच्या पत्रकार दालनात विरोधी पक्षांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव, काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले, डॉ. जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
सरकारच्या कामकाजावर टीका
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. “मंत्री राजीनामा देतात, पण सभागृहात याबाबत काहीच सांगितले जात नाही. आतापर्यंत मी विधिमंडळात ३६ वर्षे काम केले आहे, पण असा प्रकार कधी पाहिला नाही, हा सभागृहाच्या सदस्यांचा हक्क आहे, संविधानावर चर्चा केली पण तेच संविधाना पायदळी तुडवण्याचे काम पदोपदी होत आहे.” असे ते म्हणाले.
लक्षवेधींचा आकडा वाढला
जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचनांच्या संख्येवरही बोट ठेवले. “आपल्या सोयीच्या लक्षवेधींना प्राधान्य द्यायचे, अधिकाऱ्यांवर एसआयबी लावण्यापर्यंत अधिकाऱ्यांना निलंबित करणे हेच सुरू आहे. एका दिवसात ३ लक्षवेधी पुरे आहेत मात्र हा आकडा तीस पेक्षा पुढे जात आहे. यामुळे लक्षवेधींचे महत्व कमी झाले. पुढच्या अधिवेशनात दिवसाला ५० लक्षवेधी आल्या तर आश्चर्य वाटायला नको. घटना नुकतीच झाले असेल तर त्यावर लक्षवेधी टाकणे योग्य आहे पण ८-१० वर्षांपूर्वी झालेल्या घटनांवर लक्षवेधी टाकून उत्तर मिळवणे हे काम सुरु. उद्या लोक विधानसभेला लक्षवेधीसभा म्हणून संबोधू नये म्हणजे मिळवले” असंही जयंत पाटील म्हणाले.