Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:16 IST2025-11-05T13:13:30+5:302025-11-05T13:16:07+5:30
Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे हे फक्त विधानेच करतात, त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर केलेले एक तरी भाषण दाखवा, असे आव्हान फडणवीस यांनी कोल्हापुरातून केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याची माहिती देत महायुती पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. महायुतीचे तिन्ही पक्ष आपापल्या पातळीवर युती करण्याचा निर्णय घेतील. जिथे युती होत नाही, तिथे आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, मला विश्वास आहे की, महाराष्ट्रातील जनता या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट जनादेश देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Kolhapur: Maharashtra CM Devendra Fadnavis says, "Local body elections have been announced and we are ready for them. All three Mahayuti parties will decide on alliances at their own level. Where an alliance does not work out, we will go for a respectful post-poll arrangement. I… pic.twitter.com/FOcooQIllo
— ANI (@ANI) November 5, 2025
उद्धव ठाकरेंवर टीका
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली. "हे चांगले आहे. हे विरोधी पक्षाचे काम आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बाहेर आले आहेत आणि मला त्याबद्दल आनंद आहे. परंतु, उद्धव ठाकरे हे फक्त विधानेच करतात. मी हे आधीही सांगितले आहे. विकासाच्या मुद्द्यांवर त्यांचे एक तरी भाषण दाखवा", असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर
अतिवृष्टी आणि महापुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या मराठवाड्यातील बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आजपासून (५ नोव्हेंबर २०२५) त्यांच्या सलग चार दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यातून त्यांनी थेट महायुतीतील शिंदे-फडणवीस-पवार सरकारला 'दगाबाज रे' या शब्दांत आव्हान दिले. या दौऱ्यात उद्धव ठाकरे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये संवाद साधणार आहेत. या दौऱ्याचा मुख्य उद्देश, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांना आधार देणे आणि मदत व पुनर्वसन कार्यातील सरकारी अनास्था चव्हाट्यावर आणणे आहे.