देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात भाजपाची ही अशी धडपड का? वाचा, चार कारणं...

By बाळकृष्ण परब | Published: July 3, 2023 02:59 PM2023-07-03T14:59:30+5:302023-07-03T15:05:21+5:30

Maharashtra Political Crisis: मोदींसारखं नेतृत्व, देशात एकहाती सत्ता असतानाही महाराष्ट्रात भाजपाला इतर पक्ष फोडून त्यांच्या कुबड्या का घ्याव्या लागताहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्याची चार कारणं असू शकतात. 

Maharashtra Political Crisis: One-handed power in the country, Narendra Modi's leadership; Why is this the struggle of BJP in Maharashtra? Read, four reasons… | देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात भाजपाची ही अशी धडपड का? वाचा, चार कारणं...

देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात भाजपाची ही अशी धडपड का? वाचा, चार कारणं...

googlenewsNext

- बाळकृष्ण परब 
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडी थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. सुरुवातीला उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्रिपदावरून वेगळी वाटचाल, मग फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, त्यानंतर शरद पवार यांच्या पुढाकाराने घातला गेलेला महाविकास आघाडीचा घाट, उद्धव ठाकरेंनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ, मग अडीच वर्षातच ठिसूळ झालेला महाविकास आघाडीचा पाया, एकनाथ शिंदेंचं बंड, मग शिंदे-भाजपा यांचं सरकार, कोर्टकचेऱ्या अशा सगळ्या घडामोडी घडून काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारनं वर्षपूर्ती केली होती. राज्याच्या राजकारणात  आता काहीशी स्थिरता येत आहे, असं वाटत असतानाच रविवारी मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाला. यावेळी हादरला तो शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. रविवार सकाळपासून अचानक घडामोडी घडून दुपारच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घडामोडीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. त्याचवेळी, मोदींसारखं नेतृत्व, देशात एकहाती सत्ता असतानाही महाराष्ट्रात भाजपाला कुबड्या का घ्याव्या लागताहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्याची चार कारणं असू शकतात. 

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाल्यानंतर २०१४ मध्ये भाजपाने केंद्रात स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली होती. तर तेव्हा आलेल्या मोदीलाटेचा फायदा उचलत विविध राज्यांमध्येही बहुमतासह सत्ता मिळवली होती. मात्र याला महाराष्ट्र राज्य अपवाद ठरलं होतं. खूप प्रयत्नांती भाजपा महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर पोहोचली होती. मात्र बहुमताचा आकडा गाठणं तेव्हाच्या मोदीलाटेतही भाजपाला शक्य झालं नव्हतं. चार पक्ष स्वतंत्र लढल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने कडवी झुंट दिल्याने तेव्हा भाजपाचा खेळ बिधडला होता. त्यानंतरही भाजपाने महाराष्ट्रात जनाधार वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यात फारसं यश मिळू शकलं नाही. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढण्याऐवजी घटल्या. त्यानंतर घडलेल्या घडामोडीत महाविकास आघाडीचा जन्म होऊन भाजपाला सत्तेबाहेर राहावे लागले. पुढच्या काळात भाजपाने स्वबळाच्या दिशेने पावले टाकून पाहिली. पण आपण स्वबळावर १४५ जागा जिंकू शकतो का? याबाबत भाजपाच्या मनात सातत्याने न्यूनगंडाची भावना निर्माण झालेली आहे की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. त्यातूनच गतवर्षी शिंदेंची साथ घेऊन युती सरकार स्थापन केलं गेलं. मात्र त्यातूनही पुढच्या निवडणुकीत गणित जमेल का याबाबत साशंकता असल्याने आता अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला सोबत  आणलं गेलं. आता त्यातून भाजपाचा काय फायदा होईल की हे प्रकरण भाजपावरच उलटेल हे पुढे दिसेल. 

२. महाराष्ट्रात भाजपाला इतर पक्षांचा आधार लागण्याचं दुसरं मुख्य कारण म्हणजे २०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक. भाजपा आणि मोदींसाठी ही निवडणूक मोठे आव्हान ठरणार आहे, असं आतापासूनच दिसतंय. भाजपाचा सहजासहजी पराभव होण्याची चिन्हे दिसत नसली तरी ही निवडणूक जिंकण्यासाठी मोदी आणि सहकाऱ्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. कर्नाटक, हिमाचलमध्ये झालेला पराभव, इतर राज्यांत बिकट परिस्थिती यामुळे २०२४ मध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपासाठी महाराष्ट्र हे राज्य महत्त्वाचे राज्य ठरणार आहे. महाराष्ट्रात ४० ते ४५ जागा जिंकण्याचं भाजपाचं लक्ष्य आहे. मात्र स्वबळावर किंवा शिंदे गटाच्या साथीने हे लक्ष्य साध्य होऊ शकत नाही, अशी चिंता भाजपाला सतावत आहे. तसेच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस सशक्त राहिल्यास लोकसभा आणि विधानसभेच्या अनेक मतदारसंघात भाजपाचं गणित बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर जागा जिंकायच्या असतील तर एकत्रित मतांची बेरीज ही ५१ टक्क्यांच्या पुढे जाणं आवश्यक आहे, हे भाजपच्या धुरिणांनी ताडलं होतं. त्यासाठीच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपाने सोबत घेऊन टक्केवारीतील तूट भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

३. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह पन्नास आमदार असले आणि शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळालेली असली तरी एकनाथ शिंदेंचा जनमानसावर कितपत प्रभाव आहे, याबाबत भाजपाला शंका वाटते. त्यातच, कल्याण मतदारसंघावरून झालेली शाब्दिक चकमक, मग जाहिरातीवरून उडालेला खटका, यामुळे नेत्यांमध्ये नसली, तरी दुसऱ्या-तिसऱ्या फळीत धुसफूस असल्याचं जाणवतं. ती येत्या काळात शांत होईलच, हे ठामपणे सांगता येत नाही. त्यामुळे भाजपाने 'प्लॅन बी' तयार ठेवल्याचंही काहींना वाटतंय. 

४. एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं असलं तरी, उद्धव ठाकरेंनाही जनतेमध्ये सहानुभूती असल्याचे दिसत आहे. त्यातच गेल्या काही काळात कुठलीही मोठी निवडणूक झालेली नसल्याने राज्य पातळीवर शिवसेनेचा मतदार किती प्रमाणावर कुणासोबत आहे हेही दिसून आलेलं नाही. त्यामुळे शिंदे आपल्याला किती उपयुक्त ठरतील. तसेच उद्धव ठाकरे किती मते आपल्याकडे खेचतील, याबाबत भाजपामध्ये शंका आहे. त्यातूनच निवडणुकीत शिंदेंना फारसा जनाधार न मिळाल्यास त्याची भरपाई करता यावी म्हणून अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना फोडून भाजपाने आपल्या बाजूने फिरवलेलं दिसत आहे. आता याचा भाजपाला कितपत फायदा किंवा तोटा होईल, हे निवडणुकांनंतरच दिसणार आहे.

Web Title: Maharashtra Political Crisis: One-handed power in the country, Narendra Modi's leadership; Why is this the struggle of BJP in Maharashtra? Read, four reasons…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.