Maharashtra Political Crisis : “दाव्यानं सांगतो, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढणार;” फडणवीसांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 17:22 IST2023-05-10T17:22:21+5:302023-05-10T17:22:49+5:30
राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

Maharashtra Political Crisis : “दाव्यानं सांगतो, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच लढणार;” फडणवीसांचा विश्वास
राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या म्हणजेच गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देऊ शकते अशी माहिती समोर येतेय. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार याची प्रतीक्षा राजकीय वर्तुळात होती. त्याचा निकाल आता गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही आशावादी असल्याचं म्हटलंय.
“आम्ही आशावादी आहोत. आमची केस मजबूत आहे. योग्य निकाल येईल याची आम्हाला अपेक्षा आहे. निकाल येईपर्यंत थांबलं पाहिजे. त्यावर कोणतेही अंदाज बांधणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालायाच्या निकालाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. त्यावर कोणतेही अंदाज बांधणं योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
यावेळी त्यांना एकनाथ शिंदे राजीनामा देतील असं विरोधक म्हणत आहेत, असा सवाल करण्यात आला. “हा मुर्खांचा बाजार आहे. एकनाथ शिंदे का राजीनामा देतील. काय चूक केली आहे. एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. तेच मुख्यमंत्री राहतील. पुढची निवडणूक एकनाथ शिंदे असतानाच लढू,” असं त्यांनी उत्तर देताना म्हटलं.
उद्या निकाल लागणार
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांनी एका सुनावणीदरम्यान यावर टिपण्णी केली. घटनापीठाकडून गुरुवारी दोन महत्त्वाचे निकाल लागण्याची शक्यता आहे. घटनापीठातील एक न्यायमूर्ती १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे लवकरच राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.