Maharashtra Political Crisis: थोडा धीर धरा, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 15:48 IST2022-07-13T15:47:45+5:302022-07-13T15:48:23+5:30
Maharashtra Political Crisis: थोडं थांबा, उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.

Maharashtra Political Crisis: थोडा धीर धरा, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री बनतील, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं सूचक विधान
नाशिक - स्वपक्षातील आमदारांनी मोठ्या प्रमाणावर बंड केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, थोडं थांबा, उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
शिंदे सरकारचं भवितव्य आणि उद्धव ठाकरेंच्या पुनरागमनाबाबत संकेत देताना जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेच्या आमदार्ंनी पक्षाचा व्हीप झुगारून मतदान केलेलं आहे. त्याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर होणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पावलं उचलत या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्याच्यासमोर सुनावणी होऊन व्हीप झुगारणारे आमदार हे अपात्र ठरतील. त्यानंतर राज्यपालांना उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करावं लागेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सर्व घडामोडींचा उलगडा होईल. मात्र त्यासाठी काही काळ जावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं. ते म्हणाले की, शिवसेनेला जो उमेदवार योग्य वाटतो, त्याला ते पाठिंबा देतात. त्यांनी भाजपासोबत असताना काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता, याचीही आठवण जयंत पाटील यांनी यावेळी करून दिली.