“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:03 IST2025-07-17T12:00:26+5:302025-07-17T12:03:57+5:30

ST Corporation Pratap Sarnaik News: प्रताप सरनाईक यांनी केलेल्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे.

maharashtra monsoon session 2025 minister pratap sarnaik said i do not know what is going on in st corporation | “ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?

“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?

ST Corporation Pratap Sarnaik News: एकीकडे आषाढी वारी आणि गणेशोत्सवानिमित्त एसटी बसच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत, आषाढी वारीतून एसटीला मिळालेल्या चांगल्या उत्पन्नाविषयी माहिती दिली जात आहे, तर दुसरीकडे एसटी महामंडळातील त्रुटी, एसटी बसची झालेली दुरावस्था यांसह अनेक मुद्द्यांमुळे एसटी महामंडळ चर्चेत आहे. यातच खुद्द मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्विग्नता व्यक्त केली असून, एसटी महामंडळात काय सुरू आहे, ते मलाच माहिती नाही, असे म्हटले आहे. प्रताप सरनाईक यांनी केलेल्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे समजते. 

शिवसेना ठाकरे गटाचे सदस्य अनिल परब यांनी पुण्यातील दापोडी आणि छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा मध्यवर्ती भांडार खरेदीत झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासंदर्भात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. तसेच अन्यही काही प्रश्न यावेळी सभागृहात विचारले. यावर प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले. अधिकाऱ्यांची चौकशी होऊन आरोप निश्चित झाले तरीही ते त्याच जागी कायम राहतात, असे सांगून प्रताप सरनाईक यांनी एका अधिकाऱ्यावर नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांची जंत्रीच वाचून दाखवली. यावर सभापती राम शिंदे यांनी, कारवाई काय करणार हे सांगा, अशी सूचना केली. आमदारांनीही कारवाईची मागणी केली.

ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही

अनिल परब यांनी सभागृहात जी माहिती दिली आहे, त्यात तथ्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महामंडळात अनागोंदी सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून कामात निष्काळजीपणा, नुकसानीस प्रतिबंध न करणे, नियमावलीचा भंग करणे, नियमबाह्य खरेदी प्रक्रिया राबविणे, जास्त दराने खरेदी करणे, अतिरिक्त खरेदी करून रक्कम अडवून ठेवणे, न झालेली खरेदी दाखविणे, नोंदी ठेवण्यास दुर्लक्ष करणे, अधिकाराचा गैरवापर करणे, पुरेशी खातरजमा न करता जास्तीची रक्कम आदा करणे, वरिष्ठ लेखा अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष करणे, असे प्रकार होत आहेत. तरीही या अधिकाऱ्यांची फक्त चौकशी झाली आहे. दोषी आढळूनही अधिकारी महामंडळात कायम आहे, असे सांगत मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनिल परब यांना उद्देशून म्हटले की, तुम्हीही या खात्याचे मंत्री होतात, तुम्हालाही पटेल की या एसटी महामंडळात नेमके काय सुरू आहे तेच कळत नाही . अधिकाऱ्यांची चौकशी होऊन आरोप निश्चित झाले तरी ते त्याच जागी कायम राहतात. एसटी महामंडळात गेल्या काही वर्षांपासून काय चालले आहे, हे मलाही कळत नाही, असे उद्विग्न उद्गार खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी काढले.

दरम्यान, गंभीर गैरव्यवहारांप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर अनेक आरोप असल्याने त्यांना बडतर्फ करण्यात येईल, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. एखाद्या अधिकाऱ्याला असे बडतर्फ करू नका. ते महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) जातात आणि पुन्हा कामावर येतात. त्यासाठी त्यांना बडतर्फ करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवा. त्यांना नोटीस द्या, त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यानंतर बडतर्फ करा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. 

 

Web Title: maharashtra monsoon session 2025 minister pratap sarnaik said i do not know what is going on in st corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.