20 Feb, 26 08:59 PM
महासभेचे छायाचित्रण करणाऱ्याना महापौरांनी रोखले; ही तर दडपशाही असल्याचा विविध स्तरातून निषेध
मीरा भाईंदर महापालिकेच्या बुधवार आणि शुक्रवारच्या महासभेतील अनेक गोंधळ,नगरसेवक मोबाईल मध्ये व्हिडीओ पाहण्यात व्यग्र असणे असे अनेक प्रकारचे छायाचित्रण समाज माध्यमात आणि काही काही स्थानिक पत्रकारांनी दाखवल्याने शुक्रवारच्या सभेत सत्ताधारी भाजपाने पत्रकार कक्षात छायाचित्रण करणाऱ्यांना सुरक्षा रक्षक पाठवून छायाचित्रण बंद करायला लावले. यामुळे पत्रकरांसह काँग्रेस व भाजपाच्या एका नगरसेविकेने संताप व्यक्त केला आहे.
20 Feb, 26 08:59 PM
कॉपी पुरवण्याचा प्रयत्न, तीन अल्पवयीन ताब्यात
यावल शहरातील दहावी परीक्षा केंद्राच्या आवारात कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी केंद्रावर उर्दू व मराठी विषयाचा पेपर सुरू होता. केंद्राच्या आवारात हे तीनही जण फिरत होते. माहिती मिळताच पोलिसांनी या अल्पवयीनांना ताब्यात घेतले. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अजयकुमार वाढवे यांच्या फिर्यादीवरून वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र पवार करीत आहेत.
20 Feb, 26 08:57 PM
लातूर शहरात बुलेटस्वारांचा ‘फटाका’ बंद; दीड लाखांच्या सायलेन्सरवर पोलिसांचा रोलर!
लातूर शहरातील रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज करत माेकाटपणे फिरणाऱ्या बुलेटस्वारांना आता लातूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. नागरिकांच्या शांततेत व्यत्यय आणणाऱ्या आणि ध्वनीप्रदूषण करणाऱ्या ‘फटाका’ सायलेन्सरविराेधात धडक मोहीम राबविण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या जवळपास दीड लाखांच्या सायलेन्सरवर थेट रोलर फिरवण्यात आला आहे. या आक्रमक कारवाईमुळे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी ६१ दुचाकींची तपासणी करून त्यांनी बसविलेले बेकायदेशीर सायलेन्सर जप्त केले.
20 Feb, 26 08:55 PM
अजित पवार यांच्या अपघातावर शरद पवार का बोलत नाहीत?
20 Feb, 26 08:55 PM
सुप्रिया सुळे, शरद पवार रोहित पवारांसारखं का बोलत नाहीयेत? Amol Kolhe यांचं उत्तर काय?
20 Feb, 26 08:54 PM
आमदार शेखर निकम यांच्या मुलीचा विवाह सोहळा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिले आशिर्वाद
20 Feb, 26 08:54 PM
दादांसोबतचे ते चॅट्स; अमोल कोल्हेंनी काय सांगितलं?
20 Feb, 26 08:53 PM
धुळ्यात शिवस्मारकावरून पुन्हा राजकीय वाद पेटला
धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्यावर जहरी टीका केली आहे. छत्रपती शिवरायांच्या मनोहर चित्र मंदिराजवळील स्मारकाला काही जण विरोध करत आहेत. मात्र कितीही विरोध झाला तरी कायदेशीर लढाई लढून स्मारक उभारणारच, अशी गर्जना राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी केली. धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी स्मारकाला विरोध करणाऱ्यांनी न्यायालयातील याचिका मागे घ्यावी, अन्यथा शहरवासीयांच्या साथीने महामोर्चा काढण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
20 Feb, 26 08:52 PM
भाजप नगरसेवकांविरोधात बंजारा समाजाचे आंदोलन
छत्रपती संभाजीनगरमधील नाईक नगर चौकातील प्रवेशद्वारावरील “वसंतराव नाईक” नाव बदलण्याच्या कथित प्रयत्नांविरोधात बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे यांनी जातीय द्वेषातून कमानीवरील “वसंतराव नाईक” नाव मिटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच संबंधितांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
20 Feb, 26 08:52 PM
बर्निंग कारचा थरार; सुदैवाने जीवितहानी टळली धुळे सोलापूर महामार्गावरील घटना
जालना जिल्ह्यात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. वेगात असलेल्या कारला अचानक आग लागून ती काही क्षणांत पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. धुळे–सोलापूर महामार्गावरील वडीगोद्रीजवळ हा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कारमधील सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. संबंधित कार बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. कारला आग लागल्यानंतर स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. मात्र आग आटोक्यात न आल्याने संपूर्ण कार जळून खाक झाली. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे
20 Feb, 26 08:51 PM
अर्जुनराव खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात शिवजयंती उत्साहात
जालना येथे अर्जुन खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
20 Feb, 26 08:51 PM
७००० भटक्या श्वानांचे लसीकरण; रेबीज रोखण्यासाठी महापालिकेचे पाऊल
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येसह श्वानदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेऊन वैद्यकीय अधिकारी प्रसाद पाटील यांनी या मोहिमेची माहिती दिली. एकूण ७००० श्वानांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पुढील आठवडाभरात ५००० श्वानांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. रेबीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून ही विशेष मोहीम राबवली जात आहे. लसीकरण झाल्यानंतर संबंधित भटक्या श्वानांच्या गळ्यात वेगवेगळ्या रंगांचे पट्टे बांधले जाणार आहेत, ज्यामुळे लसीकरण झालेले श्वान ओळखणे सोपे जाईल.
20 Feb, 26 08:50 PM
विद्यापीठाने संस्थेला आकारलेला लाखोंचा दंड विद्यार्थ्यांच्या माथी.
मुंबई विद्यापीठाने कासारवडवली येथील ज्ञानगंगा शिक्षण संस्थेला विलंबित प्रवेशाच्या कारणावरून आकारलेला लाखो रुपयांचा दंड डिग्री कॉलेजने २७ विद्यार्थ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केल्याने विद्यार्थ्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
20 Feb, 26 08:49 PM
मुंबईत बोगस रेशनकार्ड रॅकेटचा पर्दाफाश; सात आरोपी अटकेत, 345 बनावट कार्ड जप्त
बोगस रेशनकार्ड तयार करून शासकीय योजनांचा लाभ घेतल्याप्रकरणी मुंबई पोलिस यांनी सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य आरोपी सुजल सत्यनारायण दयाल याच्याकडून 345 बनावट रेशनकार्ड, विविध कागदपत्रे तसेच प्रिंटिंग मशीन जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासानुसार ही बनावट कागदपत्रे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचा लाभ मिळवण्यासाठी वापरली जात होती, असा अंदाज आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
20 Feb, 26 08:49 PM
आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधी शनिवारी न्यायालयात हजर
लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे आरएसएस मानहानी प्रकरणी येत्या शनिवारी, 21 फेब्रुवारी रोजी भिवंडी न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. आरएसएसशी संबंधित मानहानी याचिकेच्या सुनावणीसाठी ही उपस्थिती राहणार आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांचे जामीनदार असलेले माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात नवीन जामीनदार सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठीच राहुल गांधी न्यायालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी दिली.
20 Feb, 26 08:48 PM
कोरोना काळातील कामांची चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती गठित
नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्याच महासभेत कोरोना काळात आणि प्रशासकीय काळात महापालिकेने केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत खालील सदस्यांचा समावेश आहे:
भाजप: प्रकाश मोरे, स्वाती गुरखे, सूरज पाटील
शिंदे शिवसेना: किशोर पाटकर, राजू कांबळे
महापौर सुजाता पाटील यांनी स्पष्ट केले की, या चौकशीत दोषी ठरलेल्या कोणावरही योग्य ती कारवाई करण्यात येईल. गणेश नाईक यांनी निवडणूक काळात कोरोना आणि प्रशासकीय काळात सुमारे ३ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली होती. आता समितीमार्फत या तक्रारींची चौकशी होणार आहे.
20 Feb, 26 08:47 PM
केरळच्या आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांचा दणका
नाशिक ग्रामीण पोलिसांनी आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा पर्दाफाश केला असून, केरळमधून येऊन महाराष्ट्रात घरफोडी व लुटमारीचे गुन्हे करणाऱ्या १२ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर या टोळीकडून तब्बल १९ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये वाडी-वऱ्हे परिसरात एका स्कॉर्पिओ गाडीला अडवून प्रवाशांच्या डोळ्यांत काहीतरी टाकून साडेचार लाखांची लूट करण्यात आली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींची बोलण्याची भाषा आणि शरीरयष्टीवरून ते केरळमधील असल्याचे निष्पन्न झाले.
20 Feb, 26 08:46 PM
२,४०० हमीभावाची घोषणा; पण खरेदी कासवगतीने, शेतकरी नाराज
राज्य शासनाच्या वतीने हमीभाव योजनेअंतर्गत मका २,४०० रुपये प्रति क्विंटल दराने नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला, विंचूर यांसह आठ ठिकाणी गेल्या दीड महिन्यापासून खरेदी सुरू आहे. या योजनेसाठी १६ हजार ३४४ मका उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र यापैकी केवळ दोन हजार शेतकऱ्यांकडून सुमारे ९० हजार क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली आहे. कासवगतीने सुरू असलेल्या खरेदीमुळे मका उत्पादक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समित्यांमध्ये १,५०० ते १,७०० रुपये इतका दर मिळत असताना शासनाच्या खरेदी केंद्रांवर ७०० ते ८०० रुपये अधिक दर मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रांना प्राधान्य देत आहेत.
20 Feb, 26 08:38 PM
मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत शासना कडे अंतिम मंजुरीसाठी असलेला विकास आराखडा रद्द
मीरा भाईंदरचा विकास आराखडा हा अंतिम मंजुरीसाठी शासना कडे प्रलंबित असताना दुसरीकडे मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शुक्रवारच्या महासभेत सदर विकास आराखडा सह उत्तनचा प्रारूप आराखडा देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराचा एकच आराखडा बनवण्यासाठी सर्वपक्षीय समिती तयार करण्याचा निर्णय सुद्धा महासभेत घेण्यात आला.
20 Feb, 26 08:38 PM
उपमुख्यमंत्री शिंदे, मंत्री सरनाईकांसह शासनाकडून मंजूर कामे आणि निधी भाजपाच्या निशाण्यावर
शिंदेसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांसह शासना कडून मंजूर कामे आणि निधी विरोधात मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत भाजपा नगरसेवकांनी निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे कलादालन, विविध समाज भवन, तरण तलाव, चेणे वॉटर फ्रंट, घोडबंदर किनारा सुशोभीकरण आदी अनेक विकासकामांना विरोध करतानाच आरोप, टीकेची राळ उठवली. भाजपाने या कामांबाबत समिती बनवण्याचा निर्णय महासभेत घेतला आहे.
20 Feb, 26 08:37 PM
दादरमध्ये भाजयुमोचे काँग्रेसविरोधात तीव्र आंदोलन
भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) मुंबईच्या वतीने दादर येथील टिळक भवन येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. “इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६” दरम्यान काँग्रेस व युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह कृत्याच्या निषेधार्थ हे आंदोलन छेडण्यात आले.
20 Feb, 26 06:27 PM
शंभूराज देसाईंची मिश्किल फटकेबाजी
सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेचा पेच अद्याप कायम असताना शिवजयंतीच्या निमित्ताने आगळंवेगळं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. एकाच मंचावर महायुतीचे तीन दिग्गज मंत्री एकत्र आले, पण त्यांच्यातील राजकीय अंतर मात्र लपून राहिलं नाही. भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्याबरोबर मध्यभागी बसलेल्या पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘दोन मंत्र्यांनी मला मध्ये घेतले होते, तिथून उठेपर्यंत मला त्यांची भीतीच वाटत होती’ अशी मिश्किल फटकेबाजी केली.
20 Feb, 26 05:58 PM
"राहुल गांधींच्या घरीच रचला कट"; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप
भाजपाच्या संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसच्या सदस्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 'इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये अटक करण्यात आलेले चार तरुण हे युवक काँग्रेसचे नेते असून काँग्रेसमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं. पात्रा यांनी दावा केला की, या चार जणांनी समिटमध्ये रीतसर नोंदणी करून आणि बारकोड मिळवून प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपले कपडे काढून निदर्शने केली. हा सर्व कट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत राहुल गांधींच्या निवासस्थानी रचला गेल्याचा आरोपही त्यांनी केला. वाचा सविस्तर
20 Feb, 26 04:51 PM
"अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय"; भारत मंडपममधील काँग्रेसच्या आंदोलनावर फडणवीसांची टीका
"काँग्रेस पक्ष इतक्या खालच्या पातळीला गेला आहे, हे पाहून खूप शरम वाटते. आज भारत मंडपममध्ये त्यांनी जे काही केले, त्यावरून त्यांचा भारतविरोधी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात भारत जेव्हा जगाचे नेतृत्व करत आहे, अशा ऐतिहासिक क्षणी अडथळा निर्माण करण्यासाठी त्यांनी हे सर्व पद्धतशीरपणे आणि नियोजित कटाचा भाग म्हणून केले आहे. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे! आम्ही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. भारताचे नाव आणि सन्मान मलीन करण्याचा हा जो क्रूर प्रयत्न झाला आहे, त्यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
20 Feb, 26 04:24 PM
संदीप देशपांडेंनी स्टेटसवरून उद्धव ठाकरेंना दिला घरचा आहेर
मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरुन ठाकरे गट आणि मनसेत फूट पडल्याचे दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्टेटसवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी रोष व्यक्त केला.
20 Feb, 26 03:19 PM
मनसेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं
मुंबई महापालिका निवडणुकीत कमी जागा घेणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वीकृत नगरसेवक आपला असावा, यासाठी आग्रही आहे. मात्र, शिवसेनेनं (ठाकरे गट) तीन नावं निश्चित केली असून मनसेचा प्रस्ताव डावलल्याची चर्चा आहे. त्यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, असं 'स्टेटस' त्यांनी ठेवलं आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख 'कोत्या मनाचा माणूस' असा केला होता.
20 Feb, 26 01:16 PM
भिवंडी महापालिका महापौरपदी नारायण चौधरी; ४८ मतं मिळवत मारली बाजी
भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाचे बंडखोर नगरसेवकर नारायण चौधरी यांनी बाजी मारली आहे. नारायण चौधरी यांना एकूण ४८ सदस्यांनी मतदान केले. तर भाजपाच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ १६ मतं मिळाली. तर कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना २५ मते मिळाली
20 Feb, 26 12:38 PM
राज-शिंदे भेटीचे कारण समोर'; अनधिकृत पार्किंगच्या समस्येवर राज ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांशी संवाद
राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अलीकडेच झालेली भेट ही निव्वळ राजकीय भेट नसून, त्यामागे शहरांच्या विकासाचा एक गंभीर हेतू असल्याचे आता स्पष्ट झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईसह पुणे आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंग हा प्रश्न जटील झाला असून, त्याचा थेट फटका वाहतूक व्यवस्थेला आणि विकासकामांना बसत आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने, राज ठाकरेंनी या भेटीत पार्किंगच्या विळख्यातून शहरांची मुक्तता करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
20 Feb, 26 12:30 PM
इंडिया AI इम्पॅक्ट समिटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026' मध्ये 'AI फॉर ॲग्रीकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स' या विषयावर संबोधित केले.
20 Feb, 26 12:24 PM
नवी मुंबई मनपाच्या विरोधी पक्षनेत्याची निवड
नवी मुंबई: महापौर व उपमहापौर निवडीनंतर झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विरोधीपक्ष नेतेपदी शिंदेसेनेचे विजय चौगुले यांची निवड करण्यात आली आहे.
20 Feb, 26 10:26 AM
मुंबई- गोवा महामार्गावर गॅस टँकरमधून गळती, परिसरात धुराचे लोट
मुंबई- गोवा महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास सीएनजी टँकरमधून अचानक मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली. ही घटना रत्नागिरीच्या सावर्डेतल्या दहिवली फाट्यावर घडली.
20 Feb, 26 09:42 AM
रणवीर सिंगला धमकी, बिष्णोई गँगने दहा कोटी मागितले
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याला बिष्णोई गँगकडून खंडणीची धमकी देण्यात आली आहे. रणवीर सिंग याच्या मॅनेजरला अमेरिकेतील नंबर असलेल्या व्हॉट्सवरून ऑडिओ मेसेज पाठवण्यात आला आहे. रणवीर सिंगकडे १० कोटी रुपये मागण्यात आले आहेत.
20 Feb, 26 09:40 AM
ईराणच्या जवळ अमेरिकेच्या लष्करी हालचाली, जगातील सर्वात मोठी युद्धनौकाही दिसली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईराणवर लष्करी कारवाई करण्याबद्दल मोठे संकेत दिले आहेत. कदाचित पुढील १० दिवसांमध्ये कळेल की अमेरिका ईराणसोबत करार करेल की, लष्करी कारवाई केली जाईल.
दरम्यान, अमेरिकन लष्कराच्या ईराण जवळ हालचाली वाढल्या आहेत. अमेरिकेचे लढाई विमान मध्य पूर्वेकडे कूच करत आहे. बुधवारी जगातील सर्वात मोठी युद्धनौका यूएसएस जेरॉल्ड आर. फोर्डचे ठिकाणी काही काळासाठी मोरक्कोजवळच्या अटलांटिक समुद्र किनाऱ्यावर दिसले. ४८ मिनिटं या युद्धनौकेचे ठिकाणी दिसत होते. त्यानंतर ही युद्धनौका भूमध्य सागराच्या दिशेने सरकताना दिसली.
वाचा >>जगात आणखी एक युद्ध पेटणार! अमेरिकेचा इराणवर हल्ला?; डोनाल्ड ट्रम्प यांनी आखला 'टू फेज' प्लॅन
20 Feb, 26 09:32 AM
सैन्याच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; बारामुल्ला येथे सापडली स्फोटके
काश्मीरच्या बारामुल्ला येथील जानबाजपोरा आझादगंज येथे भारतीय सैन्याने रात्रीच्या गस्तीदरम्यान स्फोटके जप्त करत ती निकामी केली. राष्ट्रीय महामार्गावर सैन्याने संशयास्पद वस्तू पाहिली आणि तात्काळ नागरिकांची आवाजावी थांबवत परिसर सुरक्षित केला. पोलिस, एसओजी बारामुल्ला आणि बॉम्ब निकामी पथक या कारवाईत सामील झाले. यावेळी आयईडी सुरक्षितपणे निष्क्रिय करण्यात आला, ज्यामुळे लष्कराच्या ताफ्याला आणि नागरिकांना होणारा संभाव्य धोका टाळता आला.