जगात आणखी एक युद्ध पेटणार! अमेरिकेचा इराणवर हल्ला?; डोनाल्ड ट्रम्प यांनी आखला 'टू फेज' प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 08:46 IST2026-02-20T08:44:18+5:302026-02-20T08:46:19+5:30
जर पहिल्या टप्प्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि तिथले सरकार झुकले नाही तर ट्रम्प दुसऱ्या टप्प्यातील कारवाईला ग्रीन सिग्नल देतील. ही एक व्यापक मोहिम असेल.

जगात आणखी एक युद्ध पेटणार! अमेरिकेचा इराणवर हल्ला?; डोनाल्ड ट्रम्प यांनी आखला 'टू फेज' प्लॅन
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणु कार्यक्रमाला कायमचे रोखण्यासाठी एक भयावह टू फेज सैन्य कारवाईची योजना आखली आहे. ही कारवाई ना केवळ इराणला अणु करारासाठी भाग पाडण्यासाठी असेल तर यातून तेहरानमध्ये सत्ता पालट करण्याचेही संकेत देत आहेत.
पहिल्या टप्प्यात मर्यादित प्रमाणात एअर स्ट्राईकचा वापर केला जाईल. ज्याचा हेतू इराणला अणु करार करण्यास भाग पाडले जाईल. जर इराणने त्यानंतरही आपला अणु कार्यक्रम बंद केला नाही तर अमेरिका व्यापक सैन्य मोहिम हाती घेऊ शकते. योजनेच्या पहिल्या टप्प्यात अमेरिका इराणच्या काही निवडक सैन्य ठिकाणांना अथवा सरकारी कार्यालयांना टार्गेट करेल. त्याचा मुख्य हेतू इराणला स्पष्ट संदेश देणे असेल. पुढील काही दिवसांत हा हल्ला होऊ शकतो असं अमेरिकन सूत्रांच्या आधारे बातम्या समोर येत आहेत. इराणने त्यांचे सर्व समृद्ध युरेनियम देशाबाहेर पाठवावे आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा साठा मर्यादित करावा अशी ट्रम्प यांची इच्छा आहे. इराणने हिजबुल्लाह आणि हुथी सारख्या गटांना पाठिंबा देणे थांबवावे असेही ट्रम्प यांना वाटते.
दुसऱ्या टप्प्यात व्यापक सैन्य कारवाई अन् सत्ता परिवर्तन लढाई
जर पहिल्या टप्प्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई आणि तिथले सरकार झुकले नाही तर ट्रम्प दुसऱ्या टप्प्यातील कारवाईला ग्रीन सिग्नल देतील. ही एक व्यापक मोहिम असेल. ज्यात इराणच्या सर्व सैन्य मिशनरी आणि शासन सुविधांना टार्गेट करण्यात येईल. यावेळी ट्रम्प यांचे लक्ष्य केवळ अणु केंद्रापर्यंत मर्यादित नसतील तर १९७९ च्या क्रांतीनंतर सध्या कठीण काळातून जाणाऱ्या इराणच्या सरकारला सत्तेतून दूर करणे असेल. मागील काही आठवड्यात अमेरिकेने मध्य पूर्वेत त्यांच्या सैन्यात वाढ केली आहे. त्याशिवाय १०० हून अधिक लढाऊ विमाने, २० हून अधिक युद्धनौका, २ एअरक्राफ्ट जहाजे मध्य पूर्वेत तैनात केली आहेत. त्यामुळे या भागात अमेरिकन सैनिकांची संख्या जवळपास ४० हजारांपर्यंत पोहचली आहे.
पुढील काही दिवस महत्त्वाचे
मध्य पूर्वेत अमेरिकन सैन्याचे शक्ती प्रदर्शन एक दबावतंत्राचा भाग आहे की ट्रम्प प्रशासन खरोखरच इराणच्या सरकारला अस्थिर करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे हे अद्याप स्पष्ट नाही. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच इराणमधील शासन मोठ्या संकटातून जात आहे. अलीकडेच व्हाईट हाऊसच्या सल्लागारांसोबतच्या बोर्ड ऑफ पीस बैठकीत ट्रम्प यांनी संकेत दिलेत. पुढील १०-१५ दिवसांत जगाला कळेल काय होणार आहे असं त्यांनी म्हटलं. इराणला जर सामंजस्य करार करावाच लागेल अन्यथा खूप वाईट होईल असा स्पष्ट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. इराणकडून अद्याप ट्रम्प यांच्या अटींवर सहमती देण्यात आली नाही. जिनिव्हा येथील शांतता चर्चेनंतर इराण पुढील २ आठवड्यात एक नवीन लिखित प्रस्ताव देण्याच्या तयारीत आहे असं सांगण्यात येते.