Maharashtra Lockdown: Lockdown after Gudipadva? Work on preparation of ‘SOP’ for restrictions continues, decision in Cabinet meeting | Maharashtra Lockdown : गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊन?, निर्बंधांसाठी ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Maharashtra Lockdown : गुढीपाडव्यानंतर लॉकडाऊन?, निर्बंधांसाठी ‘एसओपी’ तयार करण्याचे काम सुरू, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : कोरोनाच्या नव्या लाटेला थोपविण्यासाठी लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही, त्याशिवाय रुग्णांची संख्या नियंत्रणात येणे कठीण आहे, अशी स्पष्ट भूमिका टास्क फोर्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेतली आहे. जर तसे झाले नाही तर राज्यात गंभीर परिस्थिती येईल, असेही तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.

टास्क फोर्समधील तज्ज्ञांसोबतच्या चर्चेनंतर प्रशासकीय पातळीवरील हालचालींना वेग आला असून आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १४ दिवसांपासून तीन आठवड्यांपर्यंतच्या लाॅकडाऊनची शिफारस टास्क फोर्समधील सदस्यांनी केली आहे. तर, १४ एप्रिलनंतरच्या मंत्रिमंडळ बैठकीत लाॅकडाऊनचा निर्णय होणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या टास्क फोर्ससमवेत घेतलेल्या बैठकीत ऑक्सिजन उपलब्धता, रेमडेसिविरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढविणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे आदी मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत-्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. उडवाडिया, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. झहीर विराणी, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव उपस्थित होते.

'कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडेसिविर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबवा
- रेमडेसिविरचा अवाजवी वापर थांबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. अनावश्यक वापरामुळे आरोग्य यंत्रणेला अनावश्यक त्रासाला सामोरे जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. पुढील दहा-बारा दिवस रेमडिसीवीर काळजीपूर्वक, काटकसरीने वापरणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढील बॅचमधील रेमडेसिविरचे लाखो डोस उपलब्ध होतील. मात्र, तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल. खासगी रुग्णालयांना होणारा पुरवठा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्हावा, तर जिल्हा रुग्णालयात मात्र थेट कंपन्यांकडून रेमडेसिविर पोहचवावे. दरावरही नियंत्रण ठेवण्याबाबत चर्चा झाली. 
- यावेळी आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी देखील बोलताना आपण रेमडेसिविरचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांकडून न होता ते ठोक विक्रेत्याने थेट रुग्णालयास देणे, रेमडेसिविरसंदर्भात डॉक्टरकडून फॉर्म भरून घेणे, केंद्र सरकारच्या समन्वयाने पुरवठा वाढविणे यावर कार्यवाही झाली आहे अशी माहिती दिली.

ऑक्सिजन निर्मितीचे प्रयत्न 
गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही बैठकीत चर्चा झाली. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले की, सध्या १२०० मेट्रिक टन पैकी ९८० मेट्रिक टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी वापरला जात असून पुढच्या काही दिवसांत ही क्षमता पूर्ण होईल. केंद्र सरकारच्या समन्वयाने इतर राज्यांशी बोलून तसेच देशपातळीवरील वाहतूकदरांशी चर्चा करून ऑक्सिजन वाहतूक कशी करता येईल त्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

बैठकांचे सत्र
शनिवारी राजकीय नेत्यांसोबत चर्चा, रविवारी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांसोबत दोन तासांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य सचिवांसोबत स्वतंत्र चर्चा केली. याशिवाय, राज्यातल्या सर्व सनदी अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री बातचीत करणार आहेत. तर, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सकाळी बैठक होण्याची शक्यता आहे. यात लाॅकडाऊन व आर्थिक परिणामांची चर्चा होणार आहे.
 

टास्क फोर्सच्या सूचना
-  ९५% रुग्ण हे घरीच योग्य रीतीने उपचार घेऊन बरे होऊ शकतात, केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीने रुग्णालयाची गरज भासते त्यादृष्टीने जनजागृती करावी
-  सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करून तेथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी
-  मुंबई पालिकेसारखे ‘वॉर्ड वॉर रूम’च्या माध्यमातून बेड्सचे व्यवस्थापन करावे
-  डॉक्टरांनी आलेल्या रुग्णाला ६ मिनिटे वॉक टेस्ट करून घ्यावी मगच निर्णय घ्यावेत
- तरुण रुग्णांनादेखील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू लागली आहे त्याचे नियोजन करावे
-  ऑक्सिजन देताना तो सुयोग्य व आवश्यकतेपेक्षा जास्त न द्यावा यासाठी डॉक्टर्सना सूचित करणे
- मास्क न लावल्यास किंवा इतर नियम मोडल्यास मोठा दंड आकारणे
- एमबीबीएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा, आयुष डॉक्टरांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेणे

४ ते १० एप्रिल या कालावधीत तब्बल ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले आहेत. तर १९८२ मृत्यू झाले. सध्या मृत्युदर ०.५ टक्के इतका असून तो वाढत आहे. गेल्या महिन्यात १४ ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटिव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करत आहोत तितका दर वाढत आहे. शनिवारी २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख अँटिजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्सपैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सिजन बेड्सपैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यांत बेड्स उपलब्ध नाहीत, अशी परिस्थिती आहे. 
    - डॉ. प्रदीप व्यास, प्रधान सचिव, 
    सार्वजनिक आरोग्य विभाग

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra Lockdown: Lockdown after Gudipadva? Work on preparation of ‘SOP’ for restrictions continues, decision in Cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.