कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 21:40 IST2025-11-17T21:39:41+5:302025-11-17T21:40:12+5:30
कणकवलीत दोन्ही शिवसेना राणेंच्या ताकतीविरोधात एकत्र आल्या असताना आता येवल्यातून आणखी एक अजब राजकीय हातमिळवणी समोर येत आहे.

कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी महाराष्ट्रातील तोडा-फोडीच्या गेल्या तीन वर्षांपासूनच्या राजकारणाला तिलांजली दिली आहे. प्रस्थापितांविरोधात कोणताही पक्ष कोणासोबतही युती-आघाडी करू लागला आहे. कणकवलीत दोन्ही शिवसेना राणेंच्या ताकतीविरोधात एकत्र आल्या असताना आता येवल्यातून आणखी एक अजब राजकीय हातमिळवणी समोर येत आहे.
येवला नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारे नवीन समीकरण तयार झाले आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या युतीच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी शिंदे गट आणि शरद पवार गट एकत्र आले असून स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. किशोर दराडे बंधूंना पवार गटाकडून मिळणारा संभाव्य पाठिंबा हा या प्रयोगाचा केंद्रबिंदू मानला जात आहे. शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे आणि शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे हे या आघाडीचे नेतृत्व करत आहेत.
शिंदे गटाचे उमेदवार रुपेश दराडे यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला असून यावेळी शरद पवार गटाने शिंदे गटाला खुला पाठिंबा जाहीर केला आहे. तर भुजबळांकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) राजेंद्र लोणारी यांनी अर्ज भरला आहे. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ देखील उपस्थित होते. या स्थानिक युतीमुळे नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, महायुतीतील घटक पक्षच अनेक ठिकाणी आमनेसामने येत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.