एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:54 IST2025-12-21T17:24:21+5:302025-12-21T17:54:16+5:30
Maharashtra Local Body Election Results 2025: राज्यातील अनेक नगर परिषदांमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार चुरस दिसून आली. त्यात एकनाथ शिंदेंचं प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरातील नगर परिषदांमध्ये भाजपाने शिंदेंना जबर धक्का दिला आहे.

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
आज लागलेल्या राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेला भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाने दुसरं स्थान पटकावलं आहे. दरम्यान, राज्यातील अनेक नगर परिषदांमध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार चुरस दिसून आली. त्यात एकनाथ शिंदेंचं प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरातील नगर परिषदांमध्ये भाजपाने शिंदेंना जबर धक्का दिला आहे. तसेच दोन्ही ठिकाणी नराध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.
अंबरनाथ आणि बदलापूर येथील नगर परिषदांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता राहिलेली होती. तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर येथील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटासोबत गेले होते. दरम्यान, या दोन्ही नगर परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा अशीच मुख्य लत झाली होती. तसेच दोन्हीकडून टोकाचा प्रचार आणि आरोप प्रत्यारोप झाले होते.
दरम्यान, बदलापूर नगर परिषदेमध्ये भाजपाच्या रुचिता घोरपडे आणि शिवसेना शिंदे गटाच्या वीणा म्हात्रे यांच्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. ठाकरे गटाने येथे प्रिया गवळी यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत निकाल मात्र भाजपाच्या बाजूने लागला. तसेच भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांनी सुमारे १० हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजय मिळवला. बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे २३ आणि भाजपाचे २३ नगरसेवक निवडून आले. तर अजित पवार गटाच्या ३ नगरसेवकांनी विजय मिळवला.
तर अनेक आरोप प्रत्यारोपांमुळे गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्येही भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मुख्य लढत झाली. तर काँग्रेसनेही या दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. दरम्यान, अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर आणि भाजपाच्या तेजश्री करंजुले यांच्यात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेजश्री करंजुले यांनी सुमारे ६ हजार मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला. अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाचे २७, भाजपाचे १३, काँग्रेसचे १२ अजित पवार गटाचे ४ तर इतर २ नगरसेवक विजयी झाले.