Maharashtra MLA: आमदारांनी कसे वागावे अन् कसे वागू नये, ते ठरणार...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 13:31 IST2025-11-21T13:30:25+5:302025-11-21T13:31:21+5:30
Legislative Ethics Committee: अर्जुन खोतकर यांच्या कथित पीएच्या शासकीय निवासस्थानातील खोलीत १ कोटी ८० लाख रुपये सापडल्याच्या घटनेनंतर जवळपास सहा महिन्यांनी विधिमंडळाची नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात आली.

Maharashtra MLA: आमदारांनी कसे वागावे अन् कसे वागू नये, ते ठरणार...!
मुंबई : धुळे येथे विधिमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या कथित पीएच्या शासकीय निवासस्थानातील खोलीत १ कोटी ८० लाख रुपये सापडल्याच्या घटनेनंतर जवळपास सहा महिन्यांनी विधिमंडळाची नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती (भाजप) हे समितीचे अध्यक्ष असतील. विधिमंडळाच्या विविध समित्यांच्या सदस्यांचे आचरण कसे असावे, याचे नीतीनियम समिती निश्चित करेल.
धुळ्याच्या गेल्या मेमधील घटनेनेने एकच खळबळ उडाली होती. विधानमंडळाचे कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तत्काळ निलंबित केले होते. किशोर पाटील यांच्या निलंबनाचा कालावधी ऑक्टोबरमध्ये संपल्यानंतर त्यांचे निलंबन आणखी सहा महिन्यांनी वाढविण्यात आले आहे. किशोर पाटील हे समितीचे अध्यक्ष खोतकर यांचे पीए म्हणून धुळ्याला गेले होते. धुळ्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. तसेच, विधिमंडळ समित्यांच्या एकूणच वर्तनाचे स्वरुप निश्चित करण्यासाठी नीतिमूल्य समिती (एथिक्स कमिटी) स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले होते.
समितीने अहवाल दिल्यानंतरच वर्तनाचे नियम निश्चित होणार
समितीची कार्यकक्षा ही विधिमंडळ समित्यांनी कोणत्या नीतिमूल्यांचे पालन केले पाहिजे, अशा पद्धतीनेच निश्चित करण्यात आली आहे. आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती विधिमंडळाला अहवाल सादर करेल. त्या आधारे विधिमंडळ समित्यांच्या सदस्यांच्या वर्तनाबाबतचे नीतीनियम निश्चित केले जाणार आहेत.
समितीचे सदस्य असे
विधानसभा सदस्य - अध्यक्ष-चैनसुख संचेती, सदस्य
सुधीर मुनगंटीवार, विजय देशमुख (भाजप), दीपक केसरकर (शिंदेसेना), दिलीप वळसे पाटील (अजित पवार गट), सुनील प्रभू (उद्धवसेना), अमिन पटेल (काँग्रेस) विधान परिषद सदस्य अमरिश पटेल (भाजप), रामराजे नाईक निंबाळकर (शरद पवार गट)
समिती काय करेल ?
विधिमंडळाप्रति जनतेमध्ये असणाऱ्या विश्वासार्हतेला तडा जाऊ न देता ती अधिकाधिक दृढ व वृद्धिंगत व्हावी यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने दौऱ्याच्या वेळी कोणते आचरण करावे व कोणते आचरण टाळावे, दौरा कालावधीत कोणते संकेत पाळावेत याबाबत नीतीमूल्य समिती शिफारशी करणार आहे. विधिमंडळाने मान्यता दिल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल.
विधिमंडळाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांचे वर्तन कसे असावे यासंबंधी निश्चित असे नीतीनियम असणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे समितांचे कामकाज अधिक विश्वासार्ह होईल, असा मला विश्वास आहे.- प्रा. राम शिंदे, सभापती विधान परिषद