“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 16:54 IST2025-12-13T16:53:56+5:302025-12-13T16:54:32+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2025: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या समृद्ध संसदीय परंपरेचे कौतुक केले.

“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Maharashtra Assembly Winter Session 2025: भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून या ऐतिहासिक सभागृहाच्या शंभर वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वपूर्ण कायदे, ठराव व धोरणांचा दस्तऐवज म्हणून संदर्भसमृद्ध द्वितीय ग्रंथाचे प्रकाशन विधानपरिषद सभागृहात करण्यात आले. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “विधानपरिषदेने संमत केलेली महत्त्वपूर्ण विधेयके, ठराव आणि धोरणे” या ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत संमत झालेली विधेयके, ठराव आणि धोरणे हे केवळ कायदे नसून सामाजिक परिवर्तनाचे ऐतिहासिक दस्तऐवज असल्याचे नमूद केले. रोजगार हमी योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार, सामाजिक न्यायाशी संबंधित कायदे यावरील चर्चांचा समावेश असलेला हा ग्रंथ भविष्यातील अभ्यासकांसाठी अमूल्य ठेवा ठरेल, असे त्यांनी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशनात या ग्रंथाचे प्रकाशन होणे हे ऐतिहासिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
वरिष्ठ सभागृहाची भूमिका कायद्यांना परिपूर्ण बनवणारी
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात विधानपरिषदेला विचारप्रवर्तक आणि गुणवत्तापूर्ण चर्चांचे वरिष्ठ सभागृह असल्याचे सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन, रोजगार हमी, संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा यांसारख्या महत्त्वपूर्ण कायद्यांमध्ये विधानपरिषदेच्या सूचनांमुळे कायदे अधिक परिणामकारक झाले, असे त्यांनी नमूद केले. शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला हा ग्रंथ राज्यशास्त्राचे विद्यार्थी, अभ्यासक आणि लोकप्रतिनिधींसाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श
कार्यक्रमाचा समारोप करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या समृद्ध संसदीय परंपरेचे कौतुक केले. नियमांसह मूल्ये आणि प्रथांवर आधारित कामकाजामुळे हे सभागृह देशभर आदर्श मानले जाते, असे ते म्हणाले. नितीन गडकरी यांच्या संसदीय भाषणांचा आजही संदर्भ दिला जातो, हे त्यांच्या योगदानाचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. या ग्रंथाचा अभ्यासक व विद्यार्थ्यांना निश्चितच लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला हा द्वितीय ग्रंथ लोकशाहीच्या प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचे दस्तऐवजीकरण करणारा ठरणार आहे. भविष्यातील लोकप्रतिनिधी, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.