"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 20:55 IST2025-07-17T20:55:26+5:302025-07-17T20:55:55+5:30
Maharashtra Assembly Monsoon Session 2025: सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण केली असेच गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचं? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, दवाखान्यात औषध नाही मिळाले की आरोग्य मंत्र्याला हा न्याय लागू करायचा का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका
मुंबई - पुण्यात कोयत्या गँगने धुमाकुळ घातला होता, पण दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची टॉवेल बनियन गँग आता कार्यरत झाली आहे. त्यांच्या मनासारखे नाही झाले की ते ठोसे देतात. जेवण चांगले मिळाले नाही म्हणून मारहाण केली असेच गळकी एसटी बघून परिवहन मंत्र्यांचे काय करायचं? निकृष्ट बांधकाम करणाऱ्या मंत्र्यांचे, दवाखान्यात औषध नाही मिळाले की आरोग्य मंत्र्याला हा न्याय लागू करायचा का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
पावसाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. हे ठोश्याचे राज्य झाले आहे. महाराष्ट्र हे एक सुसंस्कृत राज्य होते पण आज आपल्या राज्याची ओळख शेतकरी आत्महत्या आणि ड्रग्समुळे होते आहे . भाजपाचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुंगटीवार म्हणाले राज्यात ११ हजार कोटींचे ड्रॅग आणि १० हजार कोटींचे सिंथेटिक ड्रग्स सापडले आहेत.हे फक्त हिमनगाचे टोक आहे, सत्ताधारी आमदार ही माहित देत आहे म्हणजे किती गंभीर स्थिती राज्यात आहे, याची कल्पना येईल. परभणी इथे सोमनाथ सूर्यवंशी या संविधानाच्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणाची हत्या झाली. श्वसनाचा आजार असल्याने मृत्यू झाल्याची माहिती सरकारने सभागृहात दिली पण आता कोर्टाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, सरकार आता काय कारवाई करणार असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.
मुंबईत Microscan आणि संलग्न कंपन्यांकडून ७०० किमी हून अधिक बेकायदेशीर ऑप्टिकल फायबर केबल टाकली, त्यात ७०० कोटींचा महसूल बुडवण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी केली. प्रत्येक ठिकाणी टेंडर मॅनेज केले जात आहे. २० टक्के कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही, मुख्यमंत्री साफसफाई करणार का? शालार्थ पोर्टल माध्यमातून जी शिक्षक भरती झाली त्यात घोटाळा झाला आहे.प्रत्येक शिक्षकाकडून ३० लाख घेण्यात आले पण एकाही संस्थाचालकावर कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात नीलेश वाघमारे सूत्रधार आहे पण सरकारच्या मर्जीमुळे तो अजूनही सापडत नाही, एका मंत्र्यांची कृपादृष्टी असल्याने अभय मिळाले आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी सभेत केली. राज्यात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे, सरकार कंगाल होत आहे मुख्यमंत्र्यांनी हा भ्रष्टाचार संपवावा अस वडेट्टीवार म्हणाले.