भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:21 IST2025-11-13T07:21:17+5:302025-11-13T07:21:39+5:30
India House News: भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या चळवळीचे लंडनमधील केंद्र राहिलेल्या इंडिया हाऊस या ऐतिहासिक इमारतीची खरेदी राज्य सरकार करणार असून स्मारक म्हणून तिचे जतन करणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
मुंबई - भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या चळवळीचे लंडनमधील केंद्र राहिलेल्या इंडिया हाऊस या ऐतिहासिक इमारतीची खरेदी राज्य सरकार करणार असून स्मारक म्हणून तिचे जतन करणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवारी ही माहिती दिली.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार हे नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थित भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्या अनुषंगाने शेलार यांनी मुंबईत बैठक घेतली. सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्त्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
राज्य सरकारच्या मित्रा या संस्थेच्या माध्यमातून इंडिया हाऊसची खरेदी करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल. त्या संबंधीचा अहवाल ही संस्था महिनाभरात तयार करेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करेल, अशी माहिती शेलार यांनी दिली. या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रेरणादायी स्मृती जतन करण्याचा सरकारचा मानस आहे.
काय आहे इंडिया हाऊस?
भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा म्हणून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये १९०५ मध्ये इंडिया हाऊसची उभारणी केली. लंडनमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय म्हणून वरकरणी दाखविले गेले. पण, ही इमारत म्हणजे स्वातंत्र्य चळवळीचे एक प्रमुख केंद्र बनले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी १९०७ मध्ये याच ठिकाणाहून स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या हालचालींना वेग दिला.
नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे या ‘लोकमत ग्लोबल अवाॅर्ड’ समारंभासाठी ऑगस्टमध्ये गेल्या होत्या. त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली. भाजपचीच ‘ऑफ बीजेपी’ ही विंग लंडनमध्ये कार्यरत आहे. त्याच्या युवाशाखेचे सरचिटणीस मयूर पाटील यांनी एक निवेदन आ. फरांदे आणि मंत्री आशिष शेलार यांना दिले. त्या अनुषंगाने शेलार यांनी मुंबईत बुधवारी घेतलेल्या बैठकीला मयूर पाटील, आ. फरांदे हे उपस्थित होते.