Maharashtra Government: शरद पवारांनी अहमद पटेलांना केला फोन, सांगितली राज्यातील परिस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 08:46 AM2019-11-24T08:46:29+5:302019-11-24T08:47:17+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केल्यापासून शरद पवारही सक्रिय झाले आहे.

Maharashtra Government: Sharad Pawar calls Ahmed Patel, tells the situation in the state | Maharashtra Government: शरद पवारांनी अहमद पटेलांना केला फोन, सांगितली राज्यातील परिस्थिती 

Maharashtra Government: शरद पवारांनी अहमद पटेलांना केला फोन, सांगितली राज्यातील परिस्थिती 

Next

मुंबईः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केल्यापासून शरद पवारही सक्रिय झाले आहे. अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणाच्या पूर्णपणे विरोधात असल्याचं सांगत पवारांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या गटनेतेपदावरून हटवले. सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना दिल्लीत फोन केला असून, सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंचं सरकार येणार असा विश्वासही त्यांनी अहमद पटेलांकडे व्यक्त केला.
 
पक्षाचा विधिमंडळ सभासद किंवा कुठलाही प्रामाणिक कार्यकर्ता भाजपासोबत सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेत सहभागी राहणार नाही, याचा मला विश्वास वाटतो. अजित पवारांना समर्थन दिलेले आमदार काल संध्याकाळी राष्ट्रवादीच्या बैठकीला पोहोचले होते. त्या सर्वच आमदारांनी शरद पवारांवर विश्वास व्यक्त केला आहे. परंतु त्यातील पाच आमदार गायब असल्याचं नंतर नवाब मलिक म्हणाले होते. इतर राष्ट्रवादीच्या आमदारांना हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. 

तत्पूर्वी काल सकाळी शरद पवारांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीची बातमी समजल्यानंतर सर्वात आधी उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘काळजी करू नका, मी सोबत आहे’ असा धीर दिला. तसेच सेनेचे आमदार सांभाळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी काही ज्येष्ठ विधिज्ञांशी सल्लामसलत केली. काँग्रेसच्या दिल्लीहून आलेल्या नेत्यांशीही संवाद साधला. सकाळी 9.30 वाजेपर्यंत प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, सुनील तटकरे हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. अजित पवारांसोबत कोणकोण आहेत, याची खातरजमा करून त्या प्रत्येकाशी स्वत: पवारांनी संपर्क साधला.

दुसरीकडे काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी 'महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या शाईने ही घटना लिहिली जाईल. काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी राज्यपालांनी दिलीच नाही. महाराष्ट्राची जनता ही संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. संविधानाची अवहेलना करून शपथविधी उरकण्यात आला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही बैठका झाल्या. तसेच शपथविधीचा निषेध करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आमचे सर्व आमदार एकत्र आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने हा सगळा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना बहुमताची चाचणी जिंकणार आहे' असं देखील अहमद पटेल यांनी म्हटलं होतं. 

Web Title: Maharashtra Government: Sharad Pawar calls Ahmed Patel, tells the situation in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.