राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! नोव्हेंबरपासून महागाई भत्त्यात ११ टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:44 AM2021-10-08T06:44:52+5:302021-10-08T06:45:38+5:30
State government employee got good news about salary: निर्णयाचा फायदा १७ लाख कर्मचाऱ्यांना तसेच साडेसहा लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनादेखील होईल.
मुंबई : राज्य सरकारीकर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा दणक्यात होणार आहे. सातवा वेतन आयोग लागू असलेल्या राज्य सरकारीकर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने गुरुवारी घेतला. ही वाढ १ ऑक्टोबर २०२१ पासून लागू केली जाईल.
शासकीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी २,२२० तर जास्तीत जास्त ७,१०० रुपये सरासरी वाढ मिळेल. केंद्र सरकारने १ जुलै २०२१ पासून महागाई भत्ता हा १७ टक्क्यांवरून २८ टक्के केला होता. ही वाढ राज्य कर्मचाऱ्यांना १ ऑक्टोबरपासून लागू केली जाईल. तथापि, जुलै ते सप्टेंबर २०२१ची थकबाकी देण्यासंदर्भात वेगळा आदेश काढण्यात येईल. या वाढीमध्ये १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० व १ जानेवारी २०२१ पासूनच्या महागाई भत्त्याचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७ टक्के इतकाच राहील. निर्णयाचा फायदा १७ लाख कर्मचाऱ्यांना तसेच साडेसहा लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनादेखील होईल.
सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. इतर मागण्यांबाबतही सरकार हाच दृष्टिकोन बाळगेल, अशी आशा आहे. - ग. दि. कुलथे, नेते, राजपत्रित अधिकारी महासंघ