Maharashtra Government: आरेमधल्या झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 18:17 IST2019-11-30T18:17:05+5:302019-11-30T18:17:45+5:30
आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे.

Maharashtra Government: आरेमधल्या झाडांच्या कत्तलीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपाला इशारा, म्हणाले...
मुंबईः गेल्या महिन्याभरापासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. ठाकरे सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. ठाकरे विश्वासदर्शक ठराव मांडत असताना भाजपानं सभात्याग केला आहे. त्यामुळे भाजपाच्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात आली. परंतु युवा सेना प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजपाच्या गोंधळावर काहीही बोलण्याचं टाळलं.
एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं त्यांना भाजपानं घातलेल्या गोंधळासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, आता लक्ष महाराष्ट्राच्या विकासावर आहे, आता कामं सुरू झालेली आहेत, इतर गोष्टींवर मला बोलायचं नाही. तसेच आता मुख्यमंत्री सांगतील आणि कॅबिनेट ठरवत जाईल, असं सूचक विधानही आदित्य ठाकरेंनी केलं आहे. ज्यांनी झाडांची कत्तल केली, त्यांच्यासंदर्भात एक एक पाऊल सावकाश उचलू. कामं आता सुरू झालेली आहेत, मुंबईसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, असंही त्यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाची स्तुती केली आहे.
दरम्यान उद्धव ठाकरेंनी काल आरे कारशेडला स्थगिती दिली असली तरी मेट्रोचं काम सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मागील राज्य सरकारच्या कोणत्याही विकासकामांना विरोध नाही. दिलेला शब्द पाळणं हे आमचं तत्त्व असल्याचं म्हणत आरे कारशेडला स्थगिती दिली होती. मेट्रो कारशेडच्या संपूर्ण कामाचा आढावा घेतल्यानंतरच पुढे काय करायचं हे ठरवलं जाईल. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या या निर्णयावर टीका केलेली होती.