मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 05:43 IST2025-09-26T05:41:39+5:302025-09-26T05:43:41+5:30
२९ लाख शेतकऱ्यांच्या दसरा, दिवाळीवर घाला, मदतीसाठी किती दिवस लागणार? २४ लाख हेक्टरवरील पिके संपली : मराठवाड्यात ७५% नुकसानीचे पंचनामे

मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
छत्रपती संभाजीनगर - मदत करा... मदत करा... असा एकच टाहो सध्या आपत्तीग्रस्त भागातून ऐकू येत आहे. अनेक नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्या सांगतानाच बांधावरच अश्रूंचा बांधही फुटतो आहे... ही अवस्था कधी दूर होणार... कधी मिळणार मदत... कसा होणार दसरा अन् कशी होईल दिवाळी, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.
एकट्या मराठवाड्यात दहा दिवसांत अनेक भागांत वारंवार अतिवृष्टी झाल्याने सुमारे २४ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचा चिखल झाला. नुकसानीचे ७५ टक्के पंचनामे झाले आहेत. पावसाने मराठवाड्यातील २९ लाख शेतकऱ्यांच्या दसरा आणि दिवाळी सणांवर घाला घातला आहे. ५ हजार ८९३ गावांमधील खरीप पेरण्या पाण्याखाली गेल्यामुळे तेथील पिकांतून शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७९२ गावांना पूरग्रस्त स्थितीचा सामना करावा लागला आहे. यामुळे २ लाख २३ हजार ६६१ शेतकरी प्रभावित झाले असून, १.९६ लाख हेक्टर पीक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. ४ हजार ४१७ घरांमध्ये पाणी शिरले, तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, १५६ जनावरे यांचादेखील बळी गेला आहे. ८८३ घरांची पडझड झाली आहे. राज्यातील अनेक भागांतील स्थिती अशीच आहे. हे सारे मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
२०२३ च्या निकषाप्रमाणे मदत वाटप, मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये
मागील तीन महिन्यांतील भरपाईपोटी शासनाने ७२१ कोटी रुपये जाहीर केले असून २०२३ च्या आदेशानुसार ती मदत वाटप होणार आहे. २०२३ ते २०२६ पर्यंत केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर व्यक्ती व भागांना मदत मिळेल. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ४ लाख, दुधाळ जनावरे प्रत्येकी ३७,५००, मेंढी व तत्सम जनावरे ४ हजार, ओढकाम करणारी जनावरे २० हजार, तर ३ हजार रुपये गोठ्याला मदत मिळेल. शेतीला ३३ टक्क्यांवरील नुकसानीला २०२३ प्रमाणे मदत मिळेल.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : राहुल गांधी
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा भागात झालेल्या अभूतपूर्व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तिथे सरकारने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण मदत द्यावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.