‘ग्रँड हयात’मध्ये रंगल्या नाट्यमय घडामोडी, पोलीस बंदोबस्तात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:52 AM2019-11-27T06:52:16+5:302019-11-27T06:52:37+5:30

‘आम्ही १६२’ असे म्हणत ज्या आमदारांनी ‘महाविकास आघाडी’च्या नेतृत्वाखाली सोमवारी सांताक्रुझ पूर्वेकडील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन केले; त्याच हॉटेलमध्ये मंगळवारीही नाट्यपूर्ण घडामोडी घडत होत्या.

Maharashtra Election, Maharashtra Government: Dramatic developments in the 'Grand Hyatt', an increase in police settlement | ‘ग्रँड हयात’मध्ये रंगल्या नाट्यमय घडामोडी, पोलीस बंदोबस्तात वाढ

‘ग्रँड हयात’मध्ये रंगल्या नाट्यमय घडामोडी, पोलीस बंदोबस्तात वाढ

Next

मुंबई : ‘आम्ही १६२’ असे म्हणत ज्या आमदारांनी ‘महाविकास आघाडी’च्या नेतृत्वाखाली सोमवारी सांताक्रुझ पूर्वेकडील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन केले; त्याच हॉटेलमध्ये मंगळवारीही नाट्यपूर्ण घडामोडी घडत होत्या. मंगळवारी दुपारी अनुक्रमे उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि ‘ग्रँड हयात’ हॉटेलकडे राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. विशेष म्हणजे या गर्दीत पुष्पगुच्छ घेऊन येणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शाखाप्रमुखही मोठ्या संख्येने हजर होते.

सोमवारी रात्री सांताक्रुझ येथील ‘ग्रँड हयात’ हॉटेलमध्ये ‘महाविकास आघाडी’ने शक्तिप्रदर्शन केले आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. मंगळवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरत असतानाच ग्रँड हयात हॉटेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परिसरात जमू लागले. शिवसेना शाखाप्रमुखांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हॉटेलमधील ये-जा वाढू लागली. काही उत्साही कार्यकर्ते तर पुष्पगुच्छ घेऊन प्रवेशद्वारावर गोळा झाले. शिवसेनेच्या शाखाप्रमुखांसोबत सेनेचे कार्यकर्तेही दाखल झाले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्यांनंतर तर यात आणखी भर पडू लागली.

काँग्रेसचे स्टीकर लावलेली वाहने हॉटेल परिसरात वाढू लागली. त्यामुळे हॉटेलच्या परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. हॉटेलच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर पुरेसे पुरुष आणि महिला पोलीस तैनात करण्यात आले. दोन्ही प्रवेशद्वारांवर हॉटेलचे कर्मचारीही वाढविण्यात आले.

दरम्यान, हयात हॉटेलमधील राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेण्यासाठी आमदार धनंजय मुंडे दाखल होणार असल्याचे वृत्त मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पसरले; आणि त्यानंतर या परिसरात गर्दी अधिकच वाढू लागली.

धनंजय मुंडे यांची राष्टÑवादीचे कार्यकर्ते वाट पाहात होते, पण दुपारचे चार वाजले तरी मुंडे दाखल होण्याची चिन्हे दिसत नसल्याने जमू लागलेली गर्दी पुन्हा पांगू लागली. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर हयात हॉटेलमधील आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये नेणार असल्याचे वृत्त परिसरात पसरले; आणि पुन्हा येथील राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच हयात हॉटेलच्या लॉबीमध्ये आमदारांसह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र होते.

कुठे जल्लोष, तर कुठे शांतता...
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना, राष्टÑवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अल्पमतातील सरकार अखेर पडले, अशी चर्चा त्यांच्यात होती. आमच्याकडेच बहुमत असून सत्याचा विजय झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील करी रोड स्टेशनबाहेरील परिसरासह अनेक ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात शांतता असल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Dramatic developments in the 'Grand Hyatt', an increase in police settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.