Maharashtra Election 2019: When CM Devendra Fadanvis calls Amit Shah at 12 pm | Maharashtra Election 2019: जेव्हा रात्री 12 वाजता मुख्यमंत्री अमित शहांना फोन करतात तेव्हा...

Maharashtra Election 2019: जेव्हा रात्री 12 वाजता मुख्यमंत्री अमित शहांना फोन करतात तेव्हा...

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला राज्यात वेग आलेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीतील जत येथील सभेत अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलं.

यावेळी अमित शहा म्हणाले की, देवेंद्रजी, माझ्यापेक्षा वयाने कमी आहेत. मात्र मी देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही, जो दिवसरात्र महाराष्ट्राची चिंता करतो, रात्री 12 वाजता मला फोन येतो तेव्हा मला समजते की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे फोन आहे, महाराष्ट्रातला उद्योग, कृषी, शेतकरी अशा विविध समस्या फडणवीसांना झोपू देत नाही. महाराष्ट्राच्या काळजीपोटी रात्री १२ वाजताही त्यांचा फोन येतो, अशा शब्दात अमित शहांनी त्यांचे कौतुक केले. 

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात सर्वत्र शांतता आहे. मात्र पाकिस्तान कुरघोडी करू पाहत आहे. मात्र त्यांच्याकडून आमचा एक जवान शहीद झाला तरी आम्ही त्यांचे दहा सैनिक मारू, अशा इशारा त्यांनी प्रचारसभेत दिला. तसेच लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. पण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक काळामध्ये काँग्रेस पक्ष दिसत नाही. तो पक्ष जणू निवडणुकांपासून पळ काढत आहे, अशी टीका शहा यांनी केली.

तसेच राहुल गांधी हे मैदान सोडून बाहेर गेले आहेत. तसेच ३७० कलम, तिहेरी तलाक व काश्मीर प्रश्न या विषयांसंदर्भात शरद पवार यांनी भूमिका जाहीर करावी, असे आव्हानही भाजपाध्यक्षांनी जाहीर सभांमधून दिले. देवेंद्र फडणवीस सरकारची पाठराखण करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याची आर्थिक पत वाढवली आहे. काँग्रेसच्या काळात वसंतराव नाईक यांच्याखेरीज एकाही मुख्यमंत्र्याला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. परंतु देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहिले. यापुढेही तेच मुख्यमंत्री राहतील. विधानसभेतील २८८ पैकी २२२ जागा भाजप व मित्रपक्षांना मिळतील, असा दावा सभांमधून अमित शहा यांनी केला.  

दरम्यान, स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्र शिक्षण, कृषी, उद्योग यामध्ये आघाडीवर होता. मात्र, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार आले आणि महाराष्ट्राचा दर्जा खाली गेला. परंतु गेल्या पाच वर्षात राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने आणि केंद्रातील मोदी सरकारमुळे पुन्हा देशात महाराष्ट्राचा विकास वेगाने होत आहे असंही अमित शहांनी सांगितले. 

Web Title: Maharashtra Election 2019: When CM Devendra Fadanvis calls Amit Shah at 12 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.