Maharashtra Election 2019: पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा इशारा; आम्ही पंतप्रधान पदाची इज्जत करतो पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 15:45 IST2019-10-14T15:35:34+5:302019-10-14T15:45:54+5:30
Maharashtra Election 2019: पंतप्रधान पद देशाच्या इभ्रतीचं पद असून आम्ही त्याचा सन्मान करतो.

Maharashtra Election 2019: पंतप्रधान मोदींना शरद पवारांचा इशारा; आम्ही पंतप्रधान पदाची इज्जत करतो पण...
पंतप्रधान पद देशाच्या इभ्रतीचं पद असून आम्ही त्याचा सन्मान करतो. तसेच आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होऊ देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहील अशी पावले टाकली पाहिजेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नड येथील सभेत सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीआधी देशात अतिरेकी कारवाया झाल्या तेव्हा या दहशतवादी कारवायांना आळा बसावा यासाठी देशातील सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आणि लष्कराने कारवाई करण्याचा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला. मात्र आजचे गृहमंत्री सांगतात, की आम्ही ५६ इंचाच्या छातीने हे सर्व करून आणलं. पाकिस्तानशी दुसरं युद्ध झालं तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यावेळी भारतीय सैन्याने आपलं शौर्य दाखवून यश मिळवलं. मात्र इंदिरा गांधींनी कधी हे मी केलं, अशी प्रसिद्धी केली नाही. इंदिराजींनी कधी श्रेय घेतलं नाही पण आजचे पंतप्रधान श्रेय घेत असल्याचे सांगत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काश्मिरची भाषा, संस्कृती वेगळी असल्याने त्यांच्या अधिकाराला संरक्षण देण्यासाठी घटनेत ३७० चे कलम आणण्यात आले. आता कलम ३७० हटवल्याने आपण तिथली जमीन खरेदी करू शकतो, हाच बदल झाला आहे. मात्र याचा गाजावाजा आजचे राज्यकर्ते मोठ्या प्रमाणावर करत आहेत. परंतु नागालॅंड, मेघालय, अरूणाचल, सिक्कीम या ईशान्येकडील राज्यांमध्ये जमीन घ्यायचा अधिकार आपल्याला नाही, त्याचं काय.. खरंतर देशात कलम ३७० किंवा ३७१ यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, कपाशीला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.