Maharashtra Election 2019: ज्याच्या सोबत 'संदेश' असतो तोच आमदार बनतो; नितेश राणेंच्या आमदारकीचे गुपित उघड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 13:28 IST2019-10-08T10:10:10+5:302019-10-10T13:28:35+5:30
पारकर गट आणि राणे समर्थकांमध्ये विळ्या भोपळ्याचे नाते आहे. यामुळे पारकर यांनी या माघारीवरून भावनिक पोस्ट केली आहे.

Maharashtra Election 2019: ज्याच्या सोबत 'संदेश' असतो तोच आमदार बनतो; नितेश राणेंच्या आमदारकीचे गुपित उघड?
मुंबई : राज्यभरात भाजपा-शिवसेनेची युती असताना तळकोकणात मात्र एकाच मतदारसंघात दोन्ही पक्षांचे अधिकृत उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नारायण राणेंचा मुलगा आणि माजी आमदार नितेश राणे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच भाजपात प्रवेश केला. तर त्याचवेळी भाजपाचे नेते संदेश पारकर यांनी बंड करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसऱ्या दिवशी नारायण राणेंचे उजवे हात समजले जाणारे सतीश सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. यामुळे पारकर यांनी माघार घेत सावंत यांनाच युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करून टाकले.
पारकर गट आणि राणे समर्थकांमध्ये विळ्या भोपळ्याचे नाते आहे. यामुळे पारकर यांनी या माघारीवरून भावनिक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी नितेश राणे हे कसे आमदार झाले याबाबतचा मोठा खुलासा केला आहे. श्रीधर नाईक यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर १९९१ साली २४ वर्षांचा संदेश पारकर पहिल्यांदा कणकवलीचा सरपंच झाला. गेल्या 28 वर्षांत संदेश पारकरने मार खाल्ला. मार दिला. संघर्ष केला. कोर्टात केला, रस्त्यावर केला, निवडणुकीत केला. तो संघर्ष एका व्यक्तीविरोधात नव्हता तर एका प्रवृत्तीविरोधात होता. ते सुधारले असतील असे मला वाटले होते. मी त्यांच्याशी काही काळ मैत्री केली हे खरे आहे. पण कडू कारले साखरेत घोळले तरी ते कडूच राहणार, हे माझ्या लक्षात आले नाही ही माझी चूक आहे, हे मान्य. त्या प्रवृत्ती सुधारल्या नाहीत, असे शल्य असल्याचेही पारकर यांनी म्हटले आहे.
या काळात पारकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास केला. यावेळी ज्या ज्या उमेदवारांसोबत संदेश पारकर होता तो आमदार झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. हे खरेही आहे. प्रमोद जठार हे देखील आपल्यामुळेच आमदार झाल्याचा दावा पारकर यांनी करताना 2014 मध्येही तेच आमदार झाले असते असे पारकर यांनी म्हटले आहे. परंतू मी तेव्हा नितेश सोबत असल्याने आमदारकीची माळ नितेशच्या गळ्यात पडल्याचा खुलासा पारकर यांनी केला आहे.
आज निवडणूक तोंडावर असताना ज्या राणेंनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घ्यायला हवा, त्याच पक्षाने राणेंचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. आज संघ आणि मोदी भाजप की राणे भाजप, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्या भाजपचे कार्यकर्ते मार खातील, पदावरून जातील आणि तिथे राणेंचे टगे कार्यकर्ते असतील, असा इशारा त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
भाजपाच्या निष्ठावंत घराण्यावर अंडी फेकली
देवगडात भाजपच्या निष्ठावंत घराण्यावर अंडी मारली. सावरकरांवर वाईट भाषेत टीका केली. बाबासाहेब पुरंदरेंना शिव्या दिल्या. संघावर चिखल उडवला. नोकरशहांवर दहशत माजवली. कुणी कणकवली तालुक्यात येणार नाही याची सोय केली. जठार त्या गोष्टी विसरले असतील. पण संघाच्या शिस्तीत वाढलेला कडवट कार्यकर्ता त्या गोष्टी कधीच विसरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.