मुंबई: निवडणूक निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या काही तास आधी फडणवीस यांनी पदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केला.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या राजीनाम्याचं पत्नी अमृता यांनी कौतुक केलं आहे. मला तुमच्या निर्णयाचा आणि भूमिकेचा अभिमान वाटतो, असं ट्विट अमृता यांनी केलं आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा, महाराष्ट्र भाजपाला टॅगदेखील केलं आहे. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. निवडणूक निकाल जाहीर होऊन 2 आठवडे पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील सत्तेचा तिढा कायम आहे.
राज्यातील मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला. मात्र शिवसेना, भाजपाला सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करता आला नाही. शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली. त्यासाठी शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चर्चेचा संदर्भ दिला. मात्र त्यावेळी अशा प्रकारचा कोणताही शब्द शिवसेनेला देण्यात आला नव्हता, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फडणवीसांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यांनी ते घेतले नाहीत असं सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला. माझे फोन घ्यायला वेळ नाही. मात्र विरोधकांशी चर्चा करायला त्यांना वेळ आहे, असा आक्षेप फडणवीस यांनी नोंदवला. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची माणसं जी वक्तव्यं करताहेत, त्यामुळे सरकार स्थापन होत नाही. आम्ही प्रत्युत्तर देऊ शकत नाही, असं समजू नका. तुमच्या भाषेपेक्षा जास्त प्रभावी भाषा आम्ही वापरू शकतो. पण आम्ही तसं करणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.
Web Title: maharashtra election 2019 Proud Of Your Decision says Amruta Fadnavis after Husband Devendra Fadnavis resigns
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.