Maharashtra Election 2019: Preparation of victory celebration outside BJP office before the outcome | महाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार 
महाराष्ट्र निवडणूक २०१९: निकालापूर्वीच भाजपा कार्यालयाबाहेर विजयोत्सवाची तयारी; ५ हजार लाडू वाटणार 

मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीला राज्यात पुन्हा बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यावरुन भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर निकालानंतरच्या जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे. ५ हजार लाडू बनविण्यात येत आहे अशी माहिती कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश भाजपाकडून प्रदेश कार्यालयाबाहेर मोठी स्क्रीन लावण्यात येणार आहे. विजयी उमेदवार याठिकाणी येतील त्यांचे सत्कार केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याठिकाणी माध्यमांना संबोधित करतील. सकाळी १० वाजल्यापासून कार्यकर्त्यांना बोलविण्यात आलं आहे. सरकार आमचं येणार आहे हे स्पष्ट आहे. ५ हजार लाडू बनविण्यात येत आहे असंही मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले. 

तसेच संध्याकाळी ५ वाजता भाजपा प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री बोलतील. सरकार आमचं येणार हे माहित आहे फक्त भाजपाला संख्या किती येणार ते पाहायचं आहे. विविध खाजगी वृत्त वाहिन्यांनी वर्तविलेल्या अंदाजाच्या आधारावर भाजपाने विजयी जल्लोष करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रदेश भाजपच्या वतीने मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मंडप आणि व्यासपीठ उभारण्यासाठी परवानगी मागितली आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपाला १२०-१४५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर शिवसेनेला ८०-१०० जागा वर्तविण्यात आल्या आहेत. काही वृत्तवाहिन्यांनी भाजपाला स्वबळावर जादुई आकडा गाठता येईल असं सांगितले आहे. जनमत महायुतीच्या बाजूने आहे असा कौल एक्झिट पोलने दिला आहे. त्यामुळे गुरुवारी २४ तारखेला निकाल जाहीर होण्यापूर्वीच ही तयारी करण्यात येत आहे. नरीमन पॅांईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेरील फुटपाथ व त्या परिसरात  मंडप व व्यासपीठ उभारण्यात अनुमती द्यावी अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. 

२४ तारखेला भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे अन्य नेते, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, विनोद तावडे तसेच पदाधिकारी उपस्थित असतील. मुंबई,ठाणे कोकणातून कार्यकर्त्यांना बोलविण्यात आलं आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल जसजसे जाहीर होतील तसं कार्यालयाबाहेर ढोलताशे, फटाके वाजवून जल्लोष करण्यात येणार आहे. 
 


Web Title: Maharashtra Election 2019: Preparation of victory celebration outside BJP office before the outcome
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.