maharashtra election 2019 ncp leader jayant patil helicopter lands in kolhapur | माळावर अचानक दिसू लागलं हेलिकॉप्टर अन् त्यातून खाली उतरले...
माळावर अचानक दिसू लागलं हेलिकॉप्टर अन् त्यातून खाली उतरले...

- रवींद्र येसादे

उत्तूर : दुपारचे पावणेतीन वाजले होते, पावसाची रिमझिम सुरू होती. वारे जोराने वाहत होते. रोजच्या पावसानं त्रस्त झालेला बळीराजा कामात व्यस्त असताना आकाशात हॅलिकॉप्टर घिरट्या मारू लागले अन् अचानक गडहिंग्लजमधील बेकनाळ येथील तळी माळावर उतरले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील. त्यांना बेकनाळकरांनी नेसरी. ता. गडहिंग्लज येथे मार्गस्थ केले.

चंदगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या सभेसाठी हॅलिकॉप्टरने प्रदेशाध्यक्ष पाटील नेसरीकडे चालले होते. पावणेतीनच्या सुमारास गडहिंग्लज परिसरात पावसाने सुरुवात केली. हॅलिकॉप्टरला पुढचे दिसेनासे झाल्यामुळे ते गडहिंग्लज शहरातून माघारी बेकनाळच्या दिशेने घिरट्या घालू लागले. बेकनाळच्या तळी माळावर हॅलिकॉप्टर चालकाला हॅलिपॅड दिसले. चालकाने तातडीने हॅलीपॅडवर लँडिंग केले. यानंतर पाटील हॅलिकॉप्टरमधून खाली उतरले. पुढील काही क्षणातच हॅलिकॉप्टर कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.हॅलिकॉप्टरमधून कोण उतरले हे पाहण्यासाठी शेतातील बळीराजा हॅलिपॅडच्या दिशेने गेले तर प्रदेशाध्यक्ष पाटील दिसले. पाटील यांनी उपस्थितांना नेसरी येथे प्रचारासाठी जाणार असल्याचे सांगितले. आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असल्याचे पाहून संभाजी धुमाळ, मधुकर जगताप, ओमकार सुर्यवंशी, विकास धुमाळ, सुधाकर सुतार आदी कार्यकर्त्त भारावून गेले . 

प्रदेशाध्यक्ष पाटील यांना बेकनाळमध्ये मोटरसायकलने आणून नेसरीच्या दिशेने चारचाकी वाहनातून मार्गस्थ करण्यात आले. मोटरसायकल वरून जाताना हवा कुणाची आहे असे विचारले असता हवा आमदार मुश्रीफ यांचीच असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 
 


Web Title: maharashtra election 2019 ncp leader jayant patil helicopter lands in kolhapur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.