Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 15:05 IST2019-10-08T14:40:37+5:302019-10-08T15:05:53+5:30
बीडमध्ये अमित शहांचा काश्मीर राग

Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा
बीड: तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना ३०० खासदारांचं बळ दिलं. त्यांनी अवघ्या ५ महिन्यांत काश्मीरमधील कलम ३७० हटवलं, असं म्हणत भाजपा अध्यक्ष अमित शहांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. पंतप्रधान मोदी गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामं मार्गी लावत असल्याचंदेखील ते म्हणाले. ते बीडमधील प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी अमित शहांनी मोदी सरकारच्या कामांचं तोंडभरुन कौतुक केलं. 'भगवानबाबांनी समाजासाठी आयुष्य वेचलं. त्यांनी समाजाला शिक्षणाचा संदेश दिला. शिक्षणातून आयुष्याला दिशा मिळू शकते, याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. त्याओबीसी, वंचितांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेलं काम अतिशय मोठं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे भगवानबाबांच्या विचारांनी जगले. त्यांनी ऊसतोड कामगार, मजुरांचे प्रश्न मार्गी लावले. आता त्यांच्या कन्या पंकजा मुंडेदेखील त्याच मार्गानं वाटचाल करत आहेत,' असं शहा म्हणाले.
सत्तर वर्ष सत्तेत असलेल्या पक्षानं ओबीसींसाठी काय केलं, असा सवाल शहा यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींचं सरकार वंचितांसाठी काम करत आहे. ओबीसींना संवैधानिक दर्जा देण्याचं काम आम्ही केलं. गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामं मोदींनी गेल्या पाच वर्षांमध्ये मार्गी लावल्याचंदेखील शहा म्हणाले.