Maharashtra Election 2019 mns chief raj thackeray slams shiv sena and bjp over election manifesto | Maharashtra Election 2019: ...तर जाळून टाका ते जाहीरनामे; राज ठाकरे शिवसेना, भाजपावर बरसले
Maharashtra Election 2019: ...तर जाळून टाका ते जाहीरनामे; राज ठाकरे शिवसेना, भाजपावर बरसले

मुंबई: जाहीरनाम्यातील शब्द पाळत नसाल, तर ते जाहीरनामे जाळून टाका, अशा शब्दांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंनीशिवसेना, भाजपाला लक्ष्य केलं. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं 10 रुपयांच्या थाळीचं आश्वासन दिलं आहे. भाजपा 5 रुपयात जेवण असं म्हणतेय. ही आश्वासनं देण्यापूर्वी गेल्या निवडणुकीवेळी दिलेल्या टोलमुक्त महाराष्ट्राच्या आश्वासनाचं काय झालं, त्या प्रश्नाचं उत्तर द्या, असं आव्हान राज ठाकरेंनी प्रभादेवीतल्या प्रचारसभेत दिलं. 

मागील निवडणुकीवेळी टोलमुक्तीचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र अजूनही टोल सुरूच आहेत. रस्त्यांवरील खड्डे तसेच आहेत. यांची महापालिकेत सत्ता असूनही यांना खड्डे बुजवता आलेले नाहीत. रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्यानंच रस्त्यांवर खड्डे पडतात. खड्डे बुजवण्यासाठी 200 कोटींचं बजेट असणारी मुंबई जगातली एकमेव महापालिका असेल, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे शिवसेनेवर बरसले. निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळू शकत नसाल, तर मग त्या शब्दाला, जाहीरनाम्याला अर्थ काय? त्यापेक्षा ते जाहीरनामे जाळून टाका, असंदेखील राज ठाकरे पुढे म्हणाले. 

'हीच ती वेळ'... मग 5 वर्षे काय केलं, शिवसेनेच्या जाहिरातीवर भडकले राज?

राज ठाकरेंनी आरे प्रकरणातील शिवसेना, भाजपाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. रात्री पानाफुलांना, झाडांना हात लावू नये, अशी आपली संस्कृती सांगते. मात्र या सरकारनं रात्री झाडांवर कुऱ्हाड चालवली. त्यांचं हे कृत्य पाहून मला रमन राघव चित्रपटाची आठवण झाली. रमन राघव रात्री अनेकांच्या हत्या करायचा. सरकारदेखील तेच करत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. आज मेट्रोसाठी झाडं चिरडली आहेत. उद्या तुम्हालादेखील चिरडतील, असं म्हणत राज यांनी उपस्थितांना मतदानातून आपला संताप व्यक्त करण्याचं आवाहन केलं.

Maharashtra Election 2019: मुंबईतील मेट्रोच मराठी माणसाचा घात करणार - राज ठाकरे

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्या शिवसेनेलाही राज यांनी लक्ष्य केलं. आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही म्हणते होते. तरीही एका रात्रीत 2700 झाडं तोडली. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात सत्तेत आल्यावर पुन्हा जंगल घोषित करू. आरेमधील झाडं तोडून झाल्यावर जंगल घोषित करून काय करणार? तिथे गवत लावणार का?, असे प्रश्न उपस्थित करत राज यांनी शिवसेनेवर तोफ डागली. 


Web Title: Maharashtra Election 2019 mns chief raj thackeray slams shiv sena and bjp over election manifesto
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.