Maharashtra Election 2019: बंडखोर उभे करणं हे भाजपाचं यंत्र की षडयंत्र?; शिवसेना नेत्याने व्यक्त केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 10:11 IST2019-10-16T10:06:55+5:302019-10-16T10:11:45+5:30
आमची चूक दाखवा, आम्ही फक्त नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना पाहून काम केलं.

Maharashtra Election 2019: बंडखोर उभे करणं हे भाजपाचं यंत्र की षडयंत्र?; शिवसेना नेत्याने व्यक्त केली शंका
जळगाव - विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवित असले तरी बंडखोर उमेदवारांनी युतीच्या उमेदवारांची डोकेदुखी केली आहे. जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांच्याविरोधात भाजपाने बंडखोर उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे नाराज गुलाबराव पाटलांनी भाजपाविरोधात शंका उपस्थित केली आहे.
माध्यमाशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, बंडखोरांना आवारलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे, लोकसभेत आम्ही त्यांचे काम केलं तसं विधानसभेत भाजपा कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं पाहिजे. बंडखोर ऐकत नाही असं सांगतात. नेत्यांच्या शब्दांना मान ठेवायला हवं होतं. लोकसभेत आमचे कार्यकर्तेही ऐकत नव्हते पण आम्ही त्यांना समजावलं. ९ दिवसांत खासदार निवडून दिला. ५ वर्ष जो माणूस इथं मेहनत करतो, शेवटी राजकारण आमचं करिअर आहे. तोंडी घास येताना तुम्ही अशी नाटकं करता अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
तसेच आमची चूक दाखवा, आम्ही फक्त नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांना पाहून काम केलं. मात्र त्यांचे तसं नाही, बंडखोर उभे राहिलेच कसे? आम्ही जळगाव, भूसावळ म्हणजे उमेदवार उभे केले असते. आम्ही एका बापाची औलाद आहोत, प्रामाणिक काम करतो. हे भाजपाचं यंत्र आहे की षडयंत्र हे माहित नाही अशी शंका गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केली.
दरम्यान, भाजपाचे अधिकृत बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवतायेत हे राजकारणात पहिल्यांदा पाहतोय. चार महिन्यांपूर्वी भाजपाचं काम आम्ही केलं पण आमच्यासोबत असं होत नाही. कोणीही विरोधात आला तरी आम्हीच निवडून येणार आहे असा विश्वास शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत. जळगाव ग्रामी, पाचोरा, एरंडोल आणि चोपडा या ठिकाणी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यापैकी भाजपाकडून केवळ अमोल शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याबद्दल आपणास पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यथा मांडण्याची संधी मिळावी, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना केलं. मात्र तसं करता येणार नाही, असं महाजन यांनी सांगताच, दोघांमध्ये वाद सुरू झाला. सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे आणि छायाचित्रकार तो टिपत होते.